मुंबईत सर्वाधिक घरखरेदी ज्येष्ठ नागरिकांकडून! २०२४ मध्ये १५ हजार मालमत्तांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 10:18 AM2024-09-09T10:18:16+5:302024-09-09T10:20:08+5:30
गेल्या दीड वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या गृहखरेदीच्या धूमधडाक्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या गृहखरेदीच्या धूमधडाक्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती पुढे आली आहे. बांधकाम उद्योगाचे सर्वेक्षण करणाऱ्या नाइट फ्रैंक या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार चालू वर्षात आतापर्यंत मुंबईत झालेल्या एकूण घरखरेदीमधील १५ हजार २७५ मालमत्तांची खरेदी ही ज्येष्ठ नागरिकांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चालू वर्षाअखेरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांकडून होणाऱ्या घरखरेदीचा आकडा २३ हजार पार करण्याचा अंदाजदेखील या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
ज्यांचे वय ६१ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांची गणना ज्येष्ठ नागरिकांत केली जाते. कोरोना काळामध्ये मुंबईतील घरविक्री थंडावली होती. त्यामुळे २०२० मध्ये ७५५४ ज्येष्ठ नागरिकांनी घरखरेदी केली होती. २०२१ मध्ये मात्र हा आकडा १७ हजार ६८५ वर पोहोचला. तोच आलेख २०२२ मध्ये १८ हजार २४६वर, तर २०२३ मध्ये २२ हजार ८४९ पर्यंत पोहोचला आहे. ही आकडेवारी लक्षात घेता कोरोनापूर्वीच्या तुलनेत ज्येष्ठांकडून होणाऱ्या गृहखरेदीने २०० टक्क्यांचा टप्पा पार केला आहे.
मध्यमवयीनांची पीछेहाट-
एकीकडे ज्येष्ठ नागरिकांकडून होणाऱ्या घरांच्या खरेदीचा आकडा वाढत असला तरी ३० ते ४५ वयोगटातील लोकांची घरखरेदी मात्र घटल्याचे दिसत आहे. २०२३ मध्ये झालेल्या एकूण घरखरेदीमध्ये या वयोगटातील खरेदीदारांचे प्रमाण ४८ टक्के इतके होते. यंदाच्या वर्षी आतापर्यंत तेच ८ टक्क्यांची घटून ४० टक्के झाले आहे.