- सीमा महांगडेमुंबई : इंटरनेट, स्मार्ट गॅझेटच्या सहज उपलब्धतेमुळे जगात मुलांचे आॅनलाइन लैंगिक तसेच इतर विविध प्रकारचे शोषण वाढू लागले आहे. जगातल्या ५ मागे एका पालकाने आपल्या मुलांना सायबर बुलिंगचा अनुभव आल्याचे सांगितले. ही बाब सर्वेक्षणातून समोर आली. भारतात २०१८ मध्ये हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ३७ टक्के एवढे असल्याचा दावा भारतीय पालकांनी केल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे.ग्लोबल रिसर्च इंडस्ट्रीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणा-या, इप्सोसतर्फे मुलांच्या होणा-या सायबर बुलिंगवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यासाठी जगातील २८ देशांतील १६ ते ६४ वयोगटातील २० हजार ७९३ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अहवालानुसार जगामध्ये सायबर बुलिंगविषयीची जागरूकता वाढत असली तरी अद्याप जगातील २५ टक्के लोकांना सायबर बुलिंग म्हणजे नक्की काय, हेच माहीत नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.सौदी अरेबियामध्ये सायबर बुलिंगबाबत सर्वात कमी म्हणजे केवळ ३७ टक्के जागरूकता असून ६३ टक्के लोक अनभिज्ञ आहेत. तर स्वीडन, इटलीत ९१ टक्के म्हणजे सर्वाधिक जागरूकता असल्याचे समोर आले आहे. भारतात सायबर बुलिंगबाबतच्या जागरूकतेचे प्रमाण ६३ टक्के असून ३७ टक्के लोक अजूनही याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.भारतातील १४ टक्के पालकांनी त्यांची मुले दैनंदिन आयुष्यात सायबर बुलिंगला सामोरी जात असल्याचे सांगितले. १२ टक्के मुले कधी कधी तर ११ टक्के मुले एक किंवा दोनदा या प्रकाराला सामोरी गेल्याचे निदर्शनास आले आहे. ८ टक्के पालकांना सायबर बुलिंगबद्दल काहीच माहिती नसून ५५ टक्के मुले कधीच अशा प्रसंगांना सामोरी गेली नसल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे.सोशल मीडियामुळे सर्वाधिक सायबर बुलिंगचे प्रकार घडत असून जागतिक स्तरावर त्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. मोबाइलवरून सायबर बुलिंगचे प्रमाण ४८ तर आॅनलाइन मेसेजिंगमधून ते ३८ टक्के इतके आहे.भारताचा विचार केल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर बुलिंगचे प्रमाण ६६ तर मोबाइलच्या माध्यमातून ४४ टक्के आहे. आॅनलाइन मेसेजिंगच्या माध्यमातून ४७ तर आॅनलाइन चॅटरूमच्या माध्यमातून ते ५० टक्के आहे. ई-मेल्स आणि इतर वेबसाइटच्या माध्यमातून सायबर बुलिंग होण्याचे प्रमाण अनुक्रमे ४४ आणि १६ टक्के इतके आहे. तर इतर तांत्रिक माध्यमातून ते ५ टक्के आहे.मुलांचे सायबर बुलिंग म्हणजे काय?धमकी देणे ही समाजातली एक मोठी समस्या आहे. धमक्या देण्याचे प्रकार शाळेत, महाविद्यालयात, घरी किंवा आॅनलाइन माध्यमांत कुठेही घडू शकतात. हे प्रकार ठरावीक कालांतराने पुन्हा-पुन्हा घडवून आणले जातात. यामुळे मुलांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर धोका किंवा दुखापत होऊ शकते.ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच, समाजमाध्यमांतून, आॅनलाइन खेळांतून, मोबाइल फोन्सच्या माध्यमातून घडणाºया धमक्यांच्या घटनांना सायबर बुलिंग किंवा सायबर धमक्या असे म्हणतात. इंटरनेट, ईमेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांमध्ये सायबर बुलिंगचे हे प्रमाण वाढले आहे.यामुळे नैराश्य, राग, शैक्षणिक अपयश, मानसिक आघातांना बळी जाणे, असे प्रकार घडू शकतात. एखाद्या व्यक्तीबाबत अफवा पसरवणे, चुकीचे काहीतरी पोस्ट करणे, बळी पडलेल्या व्यक्तीची लाजिरवाणी छायाचित्रे किंवा व्हिडीओ पसरवणे आदींचा समावेश असतो. आॅफलाइन किंवा प्रत्यक्ष धमक्यांचे हे व्यापक रूप असू शकते.
भारतातील मुलांचे सर्वाधिक आॅनलाइन शोषण; जगातील 25 टक्के लोक सायबर बुलिंगबाबत अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 3:28 AM