सर्वाधिक प्रवासी हाताळणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:08 AM2021-08-24T04:08:48+5:302021-08-24T04:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वाधिक प्रवासी हाताळणाऱ्या विमानतळांत मुंबईने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. जुलैमध्ये मुंबई विमानतळावरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वाधिक प्रवासी हाताळणाऱ्या विमानतळांत मुंबईने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. जुलैमध्ये मुंबई विमानतळावरून ११ लाख ६ हजार ९६४ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी ये-जा केली. या यादीत दिल्ली विमानतळ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी मुंबईच्या दुप्पट म्हणजेच ११ लाख ९५ हजार ६९९ प्रवासी हाताळले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळांच्या मासिक कामगिरीचा अहवाल नुकताच सादर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध अद्यापही कायम असल्याने सध्या हवाई वाहतूक क्षेत्राची मदार देशांतर्गत प्रवाशांवर आहे. जुलैमध्ये मुंबईहून १० लाख ५ हजार ७६१ देशांतर्गत प्रवाशांनी ये-जा केली. या काळात आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या केवळ १ लाख १ हजार २०३ इतकी नोंदविण्यात आली. दिल्लीने सर्वाधिक २ लाख ६६ हजार ५३३ आंतरराष्ट्रीय आणि २० लाख २९ हजार १६६ प्रवासी हाताळले.
बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळाने आपले या यादीतील स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे. मुंबईखालोखाल बंगळुरू विमानतळाने ९,२०,९२८ आणि हैदराबादने ७,४२,०११ प्रवासी हाताळले. विमानांची प्रवासी वहन क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने ही वाढ दिसून येत असल्याचे निरीक्षण यात नोंदविण्यात आले आहे.
देशभरातील १५३ विमानतळांचा विचार करता जुलैमध्ये १ कोटी ५ लाख ३१ हजार ७९१ प्रवासी संख्या नोंदविण्यात आली. त्यात देशांतर्गत ९१ लाख ३५ हजार ६६१, तर ७ लाख ९६ हजार १३० आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे.
..............
राज्यातील विमानतळांची स्थिती
विमानतळएकूण प्रवासी
मुंबई ११,०६,९६४
पुणे २,१८,२६८
नागपूर १,०३,०३५
औरंगाबाद१७,८४७