Join us

Sharad Pawar: शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा का?; लोक काय म्हणताय, पाहा सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 8:34 AM

Sharad Pawar: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. 

मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. सध्यातरी खासदार सुप्रिया सुळे यांचेच नाव आघाडीवर आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अजित पवारांकडे येतील, असे चित्र असून पक्षातील काही नेतेमंडळींनी त्याला दुजोरा दिला आहे. 

प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे यांचीही नावे पक्षाध्यक्षपदासाठी पहिल्या दिवशी चर्चेत होती. मात्र, पटेल आणि तटकरे यांचे नेतृत्व सगळ्यांना मान्य होणार नाही. तसेच आपल्याला अध्यक्ष होण्यात रस नसल्याचे पटेल यांनीही स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आले तर त्यावर पक्षात सहमती  होऊ शकेल, असे राष्ट्रवादीतील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र याचदरम्यान सी-व्होटरने महाराष्ट्रात एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आणि लोकांना विचारले की पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा का? या प्रश्नावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा का?

  • होय- ४९ टक्के
  • नाही- ३३ टक्के
  • माहिती नाही- १८ टक्के

शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे बहुतांश लोकांचे मत असल्याचे एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे एकूण ४९ टक्के लोकांचे मत आहे. याशिवाय ३३ टक्के लोकांनी आपला निर्णय मागे घेऊ नये असे म्हटले आहे. त्याच वेळी, १८ टक्के लोकांनी 'माहिती नाही' असे उत्तर दिले.

दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी नियुक्त केलेली समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे आश्वासन शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले आणि आंदोलन थांबवण्याच्या सूचना केल्या. हा निर्णय सांगून घेतला असता तर तुम्ही मला थांबवले असते, असे पवारांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. आम्ही ५ मेपर्यंत थांबतो, नाहीतर आम्ही राजीनामे देऊ, असे या कार्यकर्त्यांनी पवारांना सांगितले. त्यावर ५ मेपर्यंत थांबावे, समितीचा तोपर्यंत निर्णय होईल, तो मान्य करूया, असं शरद पवार यांनी सांगितले. 

जयंत पाटलांची नाराजी, आव्हाडांचा राजीनामा

राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या दिवशीही वेगवान घडामोडी घडल्या असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे चर्चेत होते. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे आता अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याने जयंत पाटील सर्वाधिक अस्वस्थ आहेत. त्यांनी सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन पवार यांची भेट घेतली; परंतु, तरीही त्यांची अस्वस्थता कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रराजकारण