राज्यात सर्वाधिक पोलिस गस्त नौका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 09:37 AM2023-11-26T09:37:24+5:302023-11-26T09:38:26+5:30
Mumbai: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे उपाय योजण्यात आले आहेत. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत.
मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे उपाय योजण्यात आले आहेत. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात ३० पोलीस बोटी कार्यरत आहेत. याशिवाय राज्याने २५ ट्रॉलर भाड्याने घेतले असून, हे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलीस घटकांमार्फत सागरी किनारीभागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात.
तसेच सरकारतर्फे २८ नवीन बोटी तीन टप्प्यात घेण्याच्या प्रक्रिया सुरु आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात १० नवीन बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. राज्य पोलीस दलाकडे सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडील एक बोट - मुंबई २ हिचे आधुनिकीरण झाले आहे. चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी केला जाणार आहे.
नियंत्रण कक्षाची स्थापना
सर्व गस्ती नौकांच्या गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी, राज्याने सर्व सात किनारी घटकांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी ५३ लाख रुपये मंजूर केले आहेत.
पुढील पाच वर्षांसाठी पाच इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य शासनाने ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मोठ्या बोटी असून समुद्रात खोलवर जाण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच त्या प्रतिकूल हवामानाचा सामना देखील करू शकतात.
तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अलीकडेच ८१ मास्टर्स आणि इंजिन डायव्हर्स आणि १५८ खलाशांच्या कायमस्वरूपी भरतीला मंजुरी दिली आहे. पोलीस गस्ती नौका चालवण्यासाठी आणि नौकांच्या देखभालीसाठी मदत करतात. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने त्यांच्या जेट्टीचा वापर पोलिस नौकांसाठी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे पेट्रोलिंग करणे सोयीचे झाले आहे.
खोल समुद्रात गस्त नाैका खातात हेलकावे
राज्याच्या किनारपट्टीवरील सुरक्षेबाबत अद्यापही फारशी सजगता बाळगली जात नसल्याचे दिसून येत आहे, पोलिसांच्या गस्ती नौका खोल समुद्रात हेलकावे खात असल्याने, लांब पल्ल्यापर्यंत पाठलाग करताना अडचणी येत असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सागरी गस्तीतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सागरी सुरक्षेसाठी हवी तशी गस्त होताना दिसत नाही. पोलिसांना दिलेल्या गस्ती नाैका या खोल समुद्रात टिकणाऱ्या नाहीत. नाैका खोल समुद्रात जाताच हेलकावे खाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे या नाैकांची नियमित दुरुस्ती आणि देखभाल करणे गरजचे आहे.
वाशी खाडी ते अलिबाग, वांद्रे ते कफपरेड आणि गेट वे ते वाशी खाडीपर्यंत गस्त केली जाते. या गस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच नाैकांचे आयुष्य संपले आहे.
असे चालते काम
किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत स्थानिक मरीन पोलिस, त्यापुढील २०० सागरी मैलांपर्यंत तटरक्षक दल व आंतरराष्ट्रीय सीमांवर खोल समुद्रात नौदल रचना असते.