Join us

सुट्टीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण माथेरान; टॉय ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By सचिन लुंगसे | Published: May 04, 2024 6:43 PM

मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.

मुंबई : मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण ५ लाख प्रवासी वाहतूक करण्यात आली असून त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान ३.७५ लाख प्रवासी आणि नेरळ ते माथेरान दरम्यानच्या १.२५ लाख प्रवाशांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान २.४८ कोटी आणि नेरळ आणि माथेरान दरम्यान १.०६ कोटींचे यासह एकूण उत्पन्न ३.५४ कोटीचे मिळाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ - माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते. त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे. सध्या मध्य रेल्वे नेरळ - माथेरान - नेरळ दरम्यान दररोज ४ सेवा आणि अमन लॉज - माथेरान - अमन लॉज दरम्यान १६ सेवा चालवते, त्यापैकी १२ सेवा दररोज चालतात आणि ४ विशेष सेवा फक्त आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) चालतात. - मध्य रेल्वेने माथेरान येथे स्लीपिंग पॉड्स, ज्याला पॉड हॉटेल म्हणूनही ओळखले जाते; ते बांधण्याची तयारी केली आहे.- ज्यामध्ये सिंगल पॉड्स, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स असतील.- पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी निवासाचे विविध पर्याय उपलब्ध असतील.- वातानुकूलित पॉड्समध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सेवा, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम  सुविधा असतील.- पॉड हॉटेलच्या विकासाचे आणि कामकाजाचे कंत्राट ई - लिलावाद्वारे देण्यात आले आहे.- पर्यटक रिसेप्शनवर आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून मोबाइल ॲपद्वारे पॉड आरक्षित करू शकतील.

टॅग्स :मुंबईमाथेरान