Join us

औरंगाबादमधून उत्पादन शुल्क विभागाला सर्वाधिक महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:03 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यातील सर्वांत जास्त महसूल औरंगाबाद जिल्हा व औरंगाबाद विभागातून मिळाला आहे.

- खलील गिरकर मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यातील सर्वांत जास्त महसूल औरंगाबाद जिल्हा व औरंगाबाद विभागातून मिळाला आहे. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत या विभागाला राज्यभरातून मिळालेल्या १३ हजार ४४८ कोटी रुपयांच्या एकूण महसुलामध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्याचा वाटा ३ हजार ६८६ कोटी रुपये आहे. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यामधून ३ हजार ४३९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. औरंगाबादमधून मिळालेल्या महसुलामध्ये ७.१९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वांत कमी १२३ कोटी रुपयांचा महसूल मुंबईतून मिळाला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद विभागामध्ये समावेश होणाऱ्या जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या इतर जिल्ह्यांमध्येदेखील चांगला महसूल प्राप्त झाला आहे़ त्यामुळे औरंगाबाद विभाग महसूल प्राप्तीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. औरंगाबाद विभागाने ४ हजार २२८ कोटी रुपयांचा महसूल दिला आहे. गतवर्षी ३ हजार ९७८ कोटी महसूल गोळा झाला होता. यंदा त्यामध्ये ६.२८ टक्क्यांची वाढ झाली आहे.उत्पादन शुल्क विभागाला राज्यभरातून १३ हजार ४४८ कोटी महसूल मिळाला असून गतवर्षी हे प्रमाण १२ हजार २८७ कोटी होते. यंदा त्यामध्ये ९.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ठाणे विभागातून २ हजार ३६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागातून ३ हजार १२ कोटींचा महसूल मिळाला आहे. नाशिक विभागातून १ हजार ९३५ कोटी, कोल्हापूर विभागातून १ हजार १३१ कोटी, नागपूर विभागातून ७७४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.ठाणे विभागाद्वारे मिळालेल्या २ हजार ३६५ कोटींच्या महसुलामध्ये सर्वाधिक ९९० कोटी रुपयांचा महसूल पालघर जिल्ह्यातून मिळाला आहे. देशी मद्याची गतवर्षी ३ हजार २५६ लाख लीटर विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये ४.२ टक्क्यांनी घट झाली असून, या वेळी ३ हजार १२६ लाख लीटर विक्री झाली. विदेशी मद्याची यंदा १ हजार ७९२ लाख लीटर विक्री झाली.गतवर्षी ही विक्री १ हजार ९२३ लाख लीटर होती. यंदा त्यामध्ये ६.८१ टक्क्यांची घट झाली आहे. बीअरच्या विक्रीमध्ये तब्बल १५.५ टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी ३ हजार २४८ लाख लीटर विक्री झाली होती. यंदा हे प्रमाण २ हजार ७५९ लाख लीटर इतके खालावले आहे. वाईनची विक्री गतवर्षी ६४.६२ लाख लीटर झाली होती, यंदा ती ३.२८ टक्क्यांनी खालावून ६२.५० लाख लीटर झाली आहे.