CoronaVirus News: अंधेरी पूर्व, मुलुंडमध्ये सर्वाधिक सील इमारती; मालाड, कांदिवलीला विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:54 AM2020-07-21T01:54:29+5:302020-07-21T06:25:41+5:30
यादीतून ३६२ इमारती वगळल्या
मुंबई : मुंबईतील बहुतांश भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने प्रतिबंधित इमारतींच्या संख्येत अखेर घट होऊ लागली आहे. एकूण ६५९७ पैकी ३६२ इमारतींवरील निर्बंध काढण्यात आले आहेत. तसेच ४३ बाधित क्षेत्रही वगळण्यात आली आहेत. मात्र अद्यापही पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, मालाड, कांदिवली, बोरीवली, मुलुंड या विभागांमध्ये सील इमारतींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या आता ५५ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. तर रुग्णसंख्येतील दैनंदिन वाढ १.२६ टक्के आहे. पश्चिम उपनगरातील काही विभाग वगळता अन्य ठिकाणी सर्वच हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आहे. मिशन झिरोद्वारे अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर येथील रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यात येत आहे.
अशा इमारतींच्या परिसरात फिव्हर कॅम्प, तपासणीचे प्रमाण महापालिकेने वाढविले आहे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांनी कोणती काळजी घ्यावी, काय टाळावे? याबाबतही विभाग कार्यालयामार्फत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे काही इमारतींमधील निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच प्रतिबंधित इमारती आणि बाधित क्षेत्रांमध्ये घट दिसून येत आहे. मात्र सर्वाधिक ७२० प्रतिबंधित इमारती बोरीवलीत आहेत. त्यापाठोपाठ अंधेरी पूर्व, कांदिवली आणि मालाडमध्ये पाचशेहून अधिक इमारती सील आहेत.
बाधित क्षेत्र आटोक्यात
च्जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत ७५१ क्षेत्र बाधित होते. यामध्ये झोपडपट्टी विभागांचा समावेश सर्वाधिक आहे. यामध्ये घट होऊन आता ७०८ बाधित क्षेत्र आहेत.
च्बाधित क्षेत्रात नऊ लाख ९० हजार ८३८ निवास, ४२ लाख ७९ हजार १४ लोकसंख्या असून, या भागात आतापर्यंत ३० हजार ४५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
च्प्रतिबंधित केलेल्या ६२३५ इमारतींमध्ये दोन लाख ६२ हजार ५७० निवास, नऊ लाख ३३ हजार ३३४ लोकसंख्या आहे. या भागात आतापर्यंत २० हजार ७३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
च्वांद्रे पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मुंबईत सर्वात जास्त म्हणजेच १५३ दिवसांवर पोहोचला आहे. तर सरासरी रुग्णवाढीचा दर ०.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.च्‘आर मध्य’ बोरीवली विभागात रुग्णवाढीचा सरासरी दर सर्वाधिक म्हणजे २.५ टक्के आहे. रुग्णसंख्या २८ दिवसांमध्ये दुप्पट होत आहे.