लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परभणीचा लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याची बहुतांश सेवा लोहमार्ग पोलीस दलात झाली आहे. कॉन्स्टेबलपासून ते वरिष्ठ निरीक्षक पदापर्यंत त्याने रेल्वेत काम केले असून त्याच्या सर्व कारकीर्दीची चौकशी केली जात आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) सूत्रांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यात सेलू उपविभागीय कार्यालयात उपअधीक्षक असलेल्या पालने एका तरुणाला गुन्ह्यात न अडकविण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती, तडजोडीमध्ये दीड कोटींवर हा व्यवहार ठरल्यानंतर लाचेतील १० लाखांचा पहिला हप्ता घेताना राजेंद्र पाल व त्याचा ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना शुक्रवारी अटक करण्यात आले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील त्याच्या फ्लॅटची झडती घेऊन २४ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.
तो मुंबई लोहमार्ग पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला होता. त्यानंतर विभागीय परीक्षा देऊन १९८९ मध्ये उपनिरीक्षक बनला. मुंबई लोहमार्ग दलात नियुक्तीला होता, त्यानंतर पश्चिम विभागाचे उपायुक्तचा रीडर म्हणून काम केले, निरीक्षक बनल्यानंतर मानवी हक्क आयोगात काही वर्षे काम केल्यानंतर वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक बनला होता. अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली असून दीड वर्षापूर्वी पदोन्नतीवर परभणीला बदली झाली होती, असे सूत्रांनी सांगितले.