रेल्वे रूळ ओलांडताना जातात सर्वाधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 05:19 AM2019-01-23T05:19:28+5:302019-01-23T05:19:34+5:30
रेल्वेचे रूळ ओलांडताना २०१८ मध्ये म्हणजे गेल्या वर्षभरात सर्वाधिक १ हजार ६१९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई : रेल्वेचे रूळ ओलांडताना २०१८ मध्ये म्हणजे गेल्या वर्षभरात सर्वाधिक १ हजार ६१९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रेल्वेतून प्रवास करताना झालेल्या विविध अपघातांत २ हजार ९८१ प्रवाशांचा मृत्यूू झाला असून, ३ हजार ३४९ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २ हजार ९८१ प्रवाशांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला, तर ३ हजार ३४९ प्रवासी जखमी झाले. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक १ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला असून, ३२३ प्रवासी जखमी झाले. धावत्या गाडीमधून पडल्याने ७११ प्रवाशांचा मृत्यू, तर १ हजार ५८४ जण जखमी झाले. खांबाचा फटका लागल्याने १९ प्रवाशांचा मृत्यू आणि ९० प्रवासी जखमी झाले. फलाटामधील गॅपमध्ये पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ८ प्रवासी जखमी झाले. ओव्हरहेड वायरच्या झटक्याने २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. नैसर्गिक कारणाने ५२२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ६१७ प्रवासी जखमी झाले. रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याने ३५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अन्य कारणांनी २९ जणांचा मृत्यू झाला, तर य्७०२ प्रवासी जखमी झाले. मृत्यूचे कारण समजलेले नाही, अशा मृत प्रवाशांची संख्या १८ आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूस सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनकाडून जनजागृती कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे संरक्षक भिंती उभारण्याचे कामही सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
>दररोज अपघातात
१५ जणांचा मृत्यू
मुंबईत दररोज रेल्वे अपघातात ९ ते १५ जणांचा मृत्यू होतो. रेल्वे प्रशासनाला मुंबईतून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो, तरीदेखील रेल्वे प्रशासन मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
मध्य रेल्वे मार्गावर एकूण १ हजार ९३३ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ९२० प्रवासी जखमी झाले.
पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण १ हजार ४८ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ४२९ प्रवासी जखमी झाले.