मुंबई - राजधानी मुंबईच्या माहिम भागातील समुद्रात असलेल्या कथित मजारीवरून आता रणकंदन पेटण्याची चिन्हे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिममध्ये अनाधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा करत थेट ड्रोन फुटेजच गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत दाखवले. हे फुटेज दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका, सरकार आणि पोलीस प्रशासनाला इशारा देत महिनाभरात याठिकाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर त्याचशेजारी मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा दिला. त्यानुसार, कारवाईसाठी पालिका अधिकारीही सकाळीच मजारीवर पोहोचले. मात्र, ही मजार गेल्या २ वर्षांतील नसून तब्बल ६०० ते ६५० वर्षांपूर्वीची जुनी असल्याचे येथील ट्रस्टींनी सांगितले आहे.
माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी सतर्कता म्हणून बंदोबस्त वाढवला आहे. त्यासोबतच, घटनास्थळाचे मॅपिंग करण्याचं काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र, याठिकाणी येणाऱ्या भाविकांनीही ही मजार आजची नसून खूप जुनी असल्याचं म्हटलंय. एका भाविकाने मी ४२ वर्षांपासून इथं येतोय, त्यामुळे ही ४२ वर्षांपूर्वीची मजार असल्याचं स्पष्ट केलं. तर, माहिम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांनी ही मजार ६०० ते ६५० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा केला आहे.
माहिम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.
माहिम आणि या जागेवरं असी दोन बेटं होती, जी ६०० ते ६५० वर्षांपूर्वीपासून आहेत. ऐतिहासिक जागा असलेलं हे ठिकाण आहे, राज ठाकरे यांनी आजुबाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत बोलले असतील, तर त्यांचं मोस्ट वेलकम, असेही खंडवानी यांनी म्हटलं.
महिलेनंही सांगितला अनुभव
एका स्थानिक महिलेच्या म्हणण्यानुसार, मी २००४ पासून इथं येते. २० वर्ष झाले. अल्लाहच्या मेहरबानीने सर्वकाही ठीक होत आहे. २००५ मध्ये याठिकाणी पाणी गोड झाल्याचं बोलले जाते. त्याचसोबत येथे जमिनीतून दूध यायचे. पण लोकांची नियत असेल तशी बरकत होईल. आज जे मजारीवर दूध चढवले जाते ते पूर्वी जमिनीतून यायचे. आता दूध येत नाही असं महिलेने म्हटलं.