मनीषा म्हात्रे
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून गेल्या दोन वर्षांत ६० हजार ४३५ महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशला मागे टाकत महिला गायब होण्यामागे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असणे ही चिंतेची बाब आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशसारख्या भागातून अनेकदा नोकरीच्या बहाण्याने महिलांना मुंबईसह राज्याच्या विविध भागात वेश्या व्यवसायात अडकविले जात असल्यामुळे त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अधिक असते. अशी परिस्थिती असताना पश्चिम बंगालला मागे टाकत राज्यातूनही महिला गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक असणे चिंतेची बाब ठरत आहे.
काही महिला प्रेमभंग,
पूर्ववैमनस्य, ऑनर किलिंग, एकतर्फी प्रेमाच्या शिकार ठरतात. अनेकदा त्यांची हत्या होते. मात्र, मृतदेह सापडत नाहीत. काही जणी स्वत:हून पळून जातात, भवितव्य घडविण्यासाठी, नोकरीच्या शोधात अनेक जणी घर सोडतात. असे विविध पैलू या बेपत्ता होण्यामागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशभरातून गेल्या वर्षभरात ३ लाख ८९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी ३ लाख ८५ हजार नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले. यामध्ये १ लाख २४ हजार १७७ महिलांचा समावेश आहे. बेपत्ता होण्याच्या घटनांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश (४९,०५७) आणि पश्चिम बंगालचा (४४,२००) क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातून ६१ हजार ९२७ लोक गायब झाले आहेत. यात ३७ हजार २७२ महिलांचा समावेश आहे. तसेच २०२० मध्ये शोध न लागलेल्या २३ हजार १५७ महिलांचाही शोध लागलेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत एकूण ६० हजार ४३५ महिला गायब झाल्या आहेत. त्यापैकी ३९ हजार ८०५ महिलांचा शोध लागला असून, २० हजार ६३० महिलांचे गूढ कायम आहे.
२०२० मधील बेपत्ता २०२० मध्ये महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्यांपैकी ४२ हजार ९९१ नागरिकांचा अद्याप शोध लागलेला नाही. यामध्ये २३ हजार १५७ महिलांसह १९ हजार ८३३ पुरुषांचा समावेश आहे.