पं.समिती कार्यालयात सर्वांचीच पंचाईत
By admin | Published: January 11, 2015 11:22 PM2015-01-11T23:22:26+5:302015-01-11T23:22:26+5:30
अडीच ते तीन लाख नागरिकांचे विकास केंद्र जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून ओळखल्या गेलेल्या कल्याण पंचायत समिती कार्यालयाची पुरती वाताहात झाली
बिर्लागेट : अडीच ते तीन लाख नागरिकांचे विकास केंद्र जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून ओळखल्या गेलेल्या कल्याण पंचायत समिती कार्यालयाची पुरती वाताहात झाली असून चिमूटभर जागेत कोंडवाड्याप्रमाणे कर्मचारी या कार्यालयात काम करीत आहेत. त्यातच आता निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढणार असल्याने ते कोठे व कसे बसणार? शिवाय नागरिकांचे काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
कल्याण पंचायत समितीची इमारत १९५८ मध्ये लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आली आहे. १९६६ मध्ये त्याचे विस्तारीकरण करण्यात आले. वास्तुशास्त्र नियमानुसार या इमारतीचे आयुष्य संपले आहे. ५० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने या कार्यालयाचे आर्युमान संपले आहे व तशी नोंद स्थावर मालमत्ता नोंदवहीत करण्यात आली आहे.
१०८५.६० चौ. मी. क्षेत्रफळ असलेल्या कार्यालयाच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे प्रत्यक्षात केवळ ९९२.०० चौ.मी. इतकेच क्षेत्र उपलब्ध आहे. इतक्या कमी जागेत १७ विभागाची कार्यालये आहेत. याशिवाय सभागृह, गोडाऊन, पदाधिकारी दालन, अतिरिक्त कक्ष अशा कोंडवाड्यात ८५ ते ९० कर्मचारी अत्यंत दाटीवाटीने काम करतात. अशातच विविध गावातून तालुक्याच्या ठिकाणी अनेक कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी तर बसण्याची सोयच नाही. त्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरच उभे रहावे लागत आहे.
प्रारंभी जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे १३ गण, गट होते. त्यांनाच बसण्यास अडचण येत होती आता तर पंचायत समितीचे २६ गण आणि झेडपीचे १३ गट यामुळे इतक्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे काय? असा प्रश्न प्रशासनालाही पडला आहे.
आमसभा, मेळावे किंवा शिक्षकांचे गट संमलेने आयोजित करावयाची असतात त्या करीता बाहेरचा रस्ता धरावा लागतो.
कार्यालय परिसरात अस्वच्छता, गुटखा, पान, तंबाखू यांच्या पिचकाऱ्यांमुळे रंगविलेले कोपरे, सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, आदी घाणींच्या साम्राज्यांमुळे पंचायतींची पुरती वाताहात झालेली आहे. असे असतानाही केवळ डागडुजीवर आतापर्यंत लाखोंचा खर्च बांधकाम विभागाने केला आहे.
शासन निर्णयानुसार पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचे प्रस्ताव वास्तुशास्त्र, सार्वजनिक बांधकाम मुंबई यांचे कडील नमुना आराखडा वापरून तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
परंतु, पंचायत समिती कल्याणची इमारत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये असल्याने आराखड्यानुसार लागणारी मोकळी जागा पंचायत समिती कल्याणकडे उपलब्ध नाही. मात्र तसे असेल तर त्याच ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मूळ संकल्पनेवर आधारित नवीन आराखडा उपमुख्य वास्तुशास्त्र सा.बा. विभाग मुंबई यांचेकडून तयार करून द्यावा, असे सुचविले आहे. मात्र अद्याप याबाबत काहीच ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.