Join us

धक्कादायक! इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून रिक्षावर पडला लोखंडी रॉड, माय-लेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 7:34 PM

इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्याच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड अचानक खाली पडला जो थेट मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर जाऊन आदळला.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडून रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या माय-लेकीचा गंभीर अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात दोघींचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग लगत असलेल्या सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास शमाबानो शेख (२७) या त्यांची मुलगी आयात (९) ला घेऊन स्टेशन रोडवरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होते. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्याच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड अचानक खाली पडला जो थेट मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर जाऊन आदळला.

अपघातात शमाबानो आणि मुलगी आयात गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांनी त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. शमाबानो यांना डॉक्टरने तपासून मयत घोषित केले तर आयात हिला अंधेरीच्या कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. याची माहिती जोगेश्वरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळत अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी सुरू केली आहे. 

अपघाताच्या वृत्ताला परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा देत जोगेश्वरी पोलीस तपास करत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. संबंधित विकासावर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई