मानलं मालाडच्या मायलेकीला...समयसूचकतेमुळे टळली जीवितहानी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:22 AM2023-04-13T06:22:42+5:302023-04-13T06:23:41+5:30
टॉवरमध्ये आग लागणे आता आमबात झाली आहे. मात्र, आग लागताच प्रसंगावधान राखत त्याची खबर तातडीने अग्निशमन दलाला देण्याची समयसूचकता विरळच.
मुंबई :
टॉवरमध्ये आग लागणे आता आमबात झाली आहे. मात्र, आग लागताच प्रसंगावधान राखत त्याची खबर तातडीने अग्निशमन दलाला देण्याची समयसूचकता विरळच. असे प्रसंगावधान दाखवले आहे मालाडमधील मीनल आणि मुग्धा मयेकर या मायलेकींनी. त्यांच्यामुळे इमारतीतील एका सदनिकेला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आणि मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी टळली.
मालाड पश्चिम येथील छत्रपती शिवाजी राजे संकुलातील पंचरत्न अपार्टमेंटमध्ये तेविसाव्या मजल्यावर बुधवारी आग लागली. आग लागताच इमारतीतील धोक्याची घंटा देणारा ‘फायर अलार्म’ वाजू लागला. फायर अलार्म ऐकू येताच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या मुग्धा मयेकर या पहिलीत शिकणाऱ्या अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीने तातडीने आईकडे धाव घेतली.
दुर्घटना घडल्याचे आईला सांगितले. त्यानंतर मुग्धाच्या आईने खातरजमा केली असता तेविसाव्या मजल्यावरील सदनिकेला आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दल नियंत्रण कक्षास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.
प्रशिक्षण घेतल्याचा फायदा...
पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण घेतल्यामुळे समयसूचकता दाखविता आली आणि वेळ वाया न घालविता जीवित व वित्तहानी रोखता आली, असे मीनल मयेकर यांनी सांगितले. या दोन्ही मायलेकींनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर आणि प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.