आई व मुलाने केली ६६ लाखांच्या सोन्याची तस्करी; सीमा शुल्क विभागाने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 04:44 PM2024-04-03T16:44:33+5:302024-04-03T16:45:26+5:30
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एका ४४ वर्षाच्या मुलाला त्याच्या ६३ वर्षीय आईसह अटक केली आहे.
मनोज गडनीस, मुंबई : सुमारे ६६ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने एका ४४ वर्षाच्या मुलाला त्याच्या ६३ वर्षीय आईसह अटक केली आहे. अटक केलेल्या मुलाचे नाव हरून शहाबुद्धीन खान असे आहे तर त्यांच्या आईचे नाव मैमुना खान असे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जेद्दा येथून मुंबईत येणाऱ्या दोन प्रवाशांतर्फे सोन्याची तस्करी होणार असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी त्या विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. विमानातून बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेच्या व तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांच्याकडे सोन्याच्या ८ बांगड्या, २ चेन, दोन पायल असे एकूण १०९९ ग्रॅम सोने आढळून आले. या सोन्याची किंमत ६६ लाख रुपये इतकी आहे.