मुंबई : शिवसेनेच्या शिववड्याला टक्कर देण्यासाठी भाजपाने सोमवारी ‘नमो युवा रोजगार केंद्रा’सह ‘आईचा डब्बा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भाजपा उपाध्यक्ष आणि ‘मी मुंबई अभियान-अभिमान’चे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.‘नमो युवा रोजगार केंद्रा’अंतर्गत मुंबईत शेतकरी फिरत्या बाजाराचा शुभारंभ झाला. या वेळी संकल्पनेच्या अॅपचे लोकार्पण करताना मुख्यमंत्र्यांसोबत प्रसाद लाड, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेतील गटनेते मनोज कोटक, माथाडी कामगार नेते व आमदार नरेंद्र पाटील आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क नसल्यामुळे शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळत नव्हता. तसेच ग्राहकालापण चांगल्या दर्जाचा व स्वस्त भाजीपाला मिळत नव्हता.प्रसाद लाड यांनी गेल्या वर्षी सुरू केलेल्या आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकºयांना थेट पैसे मिळायला लागले व लोकांना चांगली भाजी मिळायला लागली. आठवडी बाजार यशस्वी झाल्यानंतर लाड यांनी सुरू केलेला शेतकरी फिरता बाजार मुंबईच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक शहरात सुरू झाला पाहिजे. ‘नमो युवा रोजगार केंद्रा’च्या एका गाडीमुळे किमान चार लोकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच ‘आईचा डब्बा’च्या माध्यमातून महिलांना रोजगार प्राप्त होईल.
शिववड्याला टक्कर देणार ‘आईचा डब्बा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:50 AM