स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सिझेरियन प्रसूतींविषयी समाजात अनेक समज, गैरसमज आहेत. मागील काही वर्षांत सिझेरियन प्रसूतींचे वाढलेले प्रमाणही याला कारणीभूत आहे. मात्र, या सिझेरियन प्रसूती एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांसाठी वरदान ठरत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. सरकारी रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चमूने केलेल्या संशोधन अहवालानुसार, एचआयव्ही गर्भवतींची सिझेरियन प्रसूती केल्यास बाळाला होणारा संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, असे निरीक्षण समोर आले आहे.
कामा रुग्णालयात जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत ३० एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांविषयी अभ्यास केला. नुकतेच या संशोधन अहवालाचे इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिप्रॉडक्शन, काॅन्ट्रासेप्शन, आब्स्टेस्ट्रीक अँड गायनोकाॅलोजी संस्थेला सादरीकरण केले आहे. ५० टक्के गर्भवतींनी ३८ आठवड्यांनंतर नोंद केली आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक गर्भवतींचे सिझेरियन करण्यात आले आहे.
- ५०% पेक्षा अधिक गर्भवतींचे सिझेरियन
- ६६% पेक्षा अधिक गर्भवतींचे बाळ सुदृढ
- २.५ किलोपेक्षा जास्त बाळांचे वजन
- २०% गर्भवतींची मुदतपूर्व प्रसूती झाली
चाचण्यानंतर ‘निगेटिव्ह’वर शिक्कामोर्तब
एचआयव्ही बाधित मातेने जन्म दिलेल्या शिशूची जन्मानंतर सहा आठवड्यांनी, सहा, १२ व १८ महिन्यांनी चाचणी केली जाते. त्यानंतरच संबंधित शिशू हे ‘एचआयव्ही निगेटिव्ह’ असल्याचे जाहीर केले जाते. एचआयव्ही बाधित माता नियमित औषध घेत असल्यास जन्मणारे शिशू हे निगेटिव्ह असण्याची शक्यता असते.
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी याविषयी सांगितले, एक किंवा दोन दशकांपूर्वी एचआयव्ही बाधित मातेकडून प्रसूतीदरम्यान जन्मणाऱ्या नवजात शिशूला एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाण उल्लेखनीय होते. आता या प्रकारच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील काही वर्षांत एचआयव्हीविषयी जनजागृती वाढली आहे. या संशोधनात डॉ. सेजल कुलकर्णी, डॉ. प्रिया बुलचंदानी, डॉ. कोमल देवनिकर, डॉ. राजश्री थटीकोंडा यांचा सहभाग होता.