भोसरीमधून विलेपार्ले पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्नीचा पत्ता लपविणाऱ्या सासूवर जावयाने फरशी तसेच चाकूने हल्ला करत तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मारेकरी इक्बाल शेख (४२) याला अवघ्या चोवीस तासात भोसरीमधून अटक केली.
विलेपार्ले पूर्वच्या सत्कार हॉटेलमागे राहणाऱ्या शामल शिगम (६१) या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या पोलिसांना सापडल्या. डोक्यात फरशीचा प्रहार करून त्यांचा खून करण्यात आल्याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले यांनी तपास सुरू करत सीसीटीव्ही पडताळले, तेव्हा शिगम यांचा जावई शेख (४२) हा त्यांना रात्री भेटायला आल्याचे समजले. त्यानुसार भोसले यांच्या पथकाने पुण्यातून शेखच्या मित्राला विश्वासात घेत भोसरी येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. परिमंडळ ८ चे पाेलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, सागवेकर, कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व पथकाने अवघ्या २४ तासात शेखला गजाआड केले.
संसार थाटण्यास पत्नीचा नकार
आठ गुन्ह्यांतील आरोपी शेख हा तीन वर्षांची शिक्षा संपवून येरवडा जेलमधून १ सप्टेंबर २०२१ रोजी सुटला. त्याने २०११मध्ये मयत शिगम यांची मुलगी लीना हिच्यासोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले होती. बायको व मुलांना भेटायला तो शिगम यांच्या घरी गेला. याठिकाणी भेट झाल्यानंतर पत्नीने दुसरे लग्न केले असून, तिला दुसऱ्या नवऱ्यापासून एक मूल असल्याचे त्याला समजले. तरीही तो लीनाला त्याच्यासोबत संसार थाटण्यास सांगत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तिला भेटायला तो गेला, तेव्हा ती घरातून मुलांसह निघून गेली होती. ती कुठे आहे, याची चौकशी त्याने सासू शामल शिगमकडे केली. मात्र, त्यांनी काहीच न सांगितल्याने अखेर शेखने सासूला संपवले.