मुंबई : पतीशी भांडण, मतभेद नसूनही सासू-सासरे त्रास देतात एवढ्याच कारणावरून सासरचे घर सोडून वेगळे राहण्याचा व चरितार्थासाठी पतीकडून पोटगी मागण्याचा पत्नीला हक्क आहे, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.औरंगाबाद खंडपीठावरील न्यायाधीश न्या. विजया के. जाधव यांनी हा निकाल देताना असेही नमूद केले की, आपल्या आई-वडिलांकडून आपल्या पत्नीला त्रास होतो म्हणून त्यांना सोडून पत्नीसह वेगळे राहण्याची पतीची तयारी नसेल तर असा पती पत्नी घर सोडून गेल्यावर तिने पुन्हा नांदायला यायला हवे, असा आग्रह धरू शकत नाही.न्या. जाधव यांनी लिहिले की, आपल्या समाजात पतीच्या इच्छा व विचारांना महत्व दिले जाते. पत्नीला सासू-सासºयांसोबत राहणे अशक्य असले तरी केवळ पतीच्या इच्छेखातर तिला त्याच घरात राहणे भाग पाडले जाते. परंतु बदलते राहणीमान व रुढ होत असलेली विभक्त कुटुंबपद्धती पाहता पत्नीच्या आवडी-निवडी आणि विचार यांनाही महत्व दिले जायला हवे. सासू-सासरे वाईट वागणूक देतात व पती त्यांना सोडून राहायला तयार नाही, अशा परिस्थितीत पत्नीने माहेरी राहणे व त्याच्याकडून पोटगीची मागणी करणे पूर्णपणे समर्थनीय ठरते.औरंगाबादच्या रहमानिया कॉलनीत राहणारे शेख बासिद शेख माजीद यांनी १३ वर्षांपूर्वी केलेली याचिका फेटाळताना न्या. जाधव यांनी हा निकाल दिला. माहेरी निघून गेलेल्या यास्मिनबानो या पत्नीस शेख बासिद यांनी दरमहा ७५० रुपये पोटगी द्यावी, हा कुटुंब न्यायालयाने दिलेला निकाल त्यांनी कायम केला. या सुनावणीत पत्नीची बाजू मांडायला कोणीही हजर नव्हते. तरीही न्या. जाधव यांनी खालच्या न्यायालयाच्या निकालाचे स्वत:हून विश्लेषण करून तो योग्य ठरविला.काय होते प्रकरण?शेख बासिद व यास्मिनबानो यांचे मे २००२ मध्ये लग्न झाले.पती व पत्नीचे आपसात काही भांडण नव्हते. परंतु सासू-सासरे वाईट वागणूक देतात व त्यांच्या सांगण्यावरून पतीही आपल्याला अधूनमधून मारहाण करतो, अशी पत्नीची तक्रार होती.वर्षभर सासरी राहिलेली यास्मिनबानो फेब्रुवारी २००४मध्ये माहेरी निघून गेली. पती आई-वडिलांना सोडून वेगळा राहणार असेल, तरच पुन्हा त्याच्याकडे जाऊ, अशी तिची भूमिका होती.कुटुंब न्यायालयात दोन प्रकरणे दाखल झाली. एक होते पतीने दाखल केलेले. पत्नी समर्थनीय कारणाविना माहेरी निघून गेल्याने तिला पुन्हा नांदायचा आदेश द्यावा, अशी त्याची मागणी होती.
सासू- सासऱ्यांशी पटत नसल्याने वेगळे राहणाऱ्या पत्नीलाही पोटगी, हायकोर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:26 AM