मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’च्या लकी ड्रॉमध्ये अडीच कोटींचे बक्षीस लागल्याचे सांगून, महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर प्रणामपत्रही पाठविले. करोडपती होण्याच्या नादात महिलेने बक्षिसासाठी मित्रमंडळींकडून कर्ज घेत स्वत:सह सासूचे दागिने गहाण ठेवले. यात महिलेची पावणेतीन लाखांना फसवणूक झाली आहे़ या प्रकरणी वडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.वडाळा परिसरात ३३ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहे. ७ नोव्हेंबर रोजी त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेत लकी ड्रॉमध्येतुमचा व्हाट्सअॅप क्रमांकाची निवड झाल्याचे सांगितले. यात अडीच कोटींचे बक्षीस लागल्याचे सांगितले. सुरुवातीला महिलेने दुर्लक्षकरत क्रमांक ब्लॉक केला. दुसऱ्या दिवशी फोन करून संबंधिताने बक्षिसाबाबत सांगितले. पैसे खात्यात जमा करण्यासाठी खात्याचाही तपशील देण्यास सांगून व्हॉट्सअॅप सुरू करण्यास भाग पाडले. व्हॉट्सअॅप सुरू करताच बक्षिसाचे बनावट प्रमाणपत्र महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठविले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला.बक्षिसासाठी महिलेला अनामत रक्कम भरण्यासही सांगितली. त्यानुसार, महिलेने शेजारी, मित्र-मैत्रिणींकडून कर्ज घेतले. मुलाच्या, पतीच्या एफडीतील रक्कमकाढली. पैसे कमी पडतात, म्हणून स्वत:सह सासूचेही दागिने गहाण ठेवत २ लाख ८७ हजार रुपये जमा केले. पुढे आणखीन पैशांची मागणी झाल्याने त्यांना संशय आला. त्यानुसार, त्यांनी वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बक्षिसासाठी विकले सासूचे दागिने; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:55 AM