मुंबई : अभ्यासावरून आई ओरडली म्हणून नववीच्या विद्यार्थिनीने वर्गमैत्रिणीबरोबर घर सोडल्याची घटना माहिममध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच दोघींचा शोध घेत, त्यांना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिमच्या किल्ला कम्पाउंड परिसरात रेहाना (नावात बदल) कुटुंबासह राहते. वांद्रे येथील अंजुमन गर्ल्स हायस्कूलमध्ये ती नववीत शिकत आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजता ती वर्गमैत्रीण रेश्मा (नावात बदल)सोबत घरी आली. तेव्हा, आई मैत्रिणीसमोरच अभ्यासावरून रेहानाला ओरडली. परीक्षा सुरू असल्याने, खेळण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र याचा रेहानाला राग आला. मैत्रिणीला घरी सोडून येते, असे सांगून ती शाळेच्या गणवेशातच निघाली. संध्याकाळ झाली तरी ती घरी न परतल्याने रेहानाचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी रेश्माच्या घरी विचारणा केली, तेव्हा दोघीही घरी आल्या नसल्याचे रेश्माच्या घरच्यांनी सांगितले. घाबरलेल्या दोन्ही कुटुंबांनी अन्य मैत्रिणींकडे चौकशी सुरू केली. मात्र त्या कुठेच सापडल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्यांनी दोघींची वाट पाहिली. मात्र त्या घरी न पतरल्याने अखेर त्यांनी माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला. त्यांनी माहिमसह जवळपासच्या विभागात गस्त वाढवून शोध सुरू केला. अखेर बुधवारी दोघीही वांद्रेच्या रिक्लेमेशन परिसरात सापडल्या.पोलिसांनी दोघींना समजावून, पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या चौकशीत, अभ्यासावरून आई ओरडल्यामुळे रेहानाने आणि रेश्माच्या घरचेही तिला अभ्यासावरून ओरडत असल्याने तिनेही घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. दोघींनाही पालकांच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अभ्यासावरून आई ओरडली म्हणून वर्गमैत्रिणीसोबत सोडले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:59 AM