Join us  

आईनेच मुलीला सोडले वाऱ्यावर

By admin | Published: July 09, 2015 1:15 AM

कामोठे येथून बेपत्ता झालेल्या प्रियांका गुप्ता (१०) हिचे अपहरण झालेलेच नसल्याचे गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केले आहे.

नवी मुंबई : कामोठे येथून बेपत्ता झालेल्या प्रियांका गुप्ता (१०) हिचे अपहरण झालेलेच नसल्याचे गुन्हे शाखा पोलिसांनी उघड केले आहे. तिच्या आईने विवाहबाह्य प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीसोबत मिळून तिला सोडले होते. तर तिच्या अपहरणाची खोटी तक्रार कामोठे पोलिसांकडे केली होती.३ जुलै रोजी कामोठे पोलीस ठाण्यात प्रियांकाच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्याचदिवशी ऐरोलीतून फ्रेन्शिला वाझ हिचेही अपहरण झालेले असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिसांनी सुरू केला. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ, कामोठेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांच्या पथकाने कसून तपासाला सुरुवात केलेली. त्यांनी चार दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करून तिघांना अटक केली आहे. आई व सावत्र पित्याने मित्राच्या मदतीने प्रियांकाला सोडून दिले होते. यानंतर तिच्या अपहरणाची खोटी तक्रार कामोठे पोलिसांकडे केली होती, असे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. हरवलेल्या प्रियांकाचा शोध सुरू असताना तिची आई पूनम गुप्ता (३५) हिच्याच वागण्यावर संशय आला. पोलिसांनी तिचे उत्तर प्रदेशमधील मूळ गाव गाठले असता खोटारडेपणा उघड झाला. तिच्या मुस्तफा खान (४२) याच्यासोबत असलेल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाला कंटाळून तिचा पती विजय गुप्ता यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली आहे. प्रियांका ही पहिल्या पतीची मुलगी असून पूनमला मुस्तफा याच्यापासून दोन वर्षांची मुलगी आहे.घटनेच्या तीन दिवस आधीच दोघेही दोन मुलींना घेऊन कामोठेला आले होते. पहिल्या पतीची मुलगी प्रियांका खटकू लागल्याने तिला सोडून देण्याचा कट त्यांनी रचला होता. मुस्तफा याने मित्र दिनेशकुमार भास्कर याच्या मदतीने प्रियांकाला मानसरोवर स्थानकात सोडून पळ काढला होता. प्रियांकाची आई पूनम, सावत्र पिता मुस्तफा व त्याचा मित्र दिनेशकुमार या तिघांनाही अटक केल्याचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चुलतभावाची भेट घडली...प्रियांकाचे वडील विजय गुप्ता हे निधनापूर्वी दोन वर्षे दिवा येथे राहत होते. त्यांचा पाणीपुरीचा व्यवसाय असताना त्यांच्यासोबत प्रियांका तिथे राहिलेली होती. दिवा हे नाव लक्षात असल्याने एका महिला प्रवाशाच्या आधारे ती दिवा येथे पोचली. वडिलांच्या पाणीपुरीच्या ठिकाणी गेली असता सध्या तिथे पाणीपुरी विकणारा तिचा चुलतभाऊ घरी गेला होता. ती रात्र एकटीने काढल्यानंतर सकाळी चुलतभावाची भेट झाली. त्यानंतर तिला चेंबूर येथे तिचे काका आत्माराम गुप्ता यांच्याकडे आधार मिळाला होता. प्नातेवाईकांचा शोध घेतला असता ती चेंबूर येथे सापडली.