- मनीषा म्हात्रे मुंबई : ‘आई पाहिजे...’ म्हणत बेवारस सोडून दिलेल्या दोन चिमुकल्यांच्या टाहोने शुक्रवारी सायन रुग्णालय गहिवरून गेले. दोन्ही मुलीच. त्यात दोघीही दिव्यांग असल्याने जन्मदात्यांनीच त्यांचा त्याग केला. सुदैवाने त्या विकृतांच्या हाती लागण्यापूर्वी सतर्क पालिका सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेत, पोलिसांच्या स्वाधीन केले. पाच दिवस उलटूनही पालक न परतल्याने पोलिसांनी पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत, त्यांचा शोध सुरू केला आहे.
सायन पोलिसांनी या दोन्हीही मुलींना चेंबूर येथील बालगृहात ठेवले आहे. ५ तारखेला सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सुरक्षारक्षक नितील भल्ला (२७) हे गेट क्रमांक १ येथे कर्तव्यावर होते. त्याचदरम्यान एका अनोळखी इसमाने औषधोपचार कक्षाबाहेर बसलेल्या दोन दिव्यांग मुलींबाबत सांगितले. मुलींचे पालक आजूबाजूला असतील म्हणून सुरुवातीला त्यांनी फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवले. दीड तास गेला. मात्र मुलींकडे कोणीही फिरकले नाही. त्यात, पावसाचा जोर वाढल्याने मुलींनी आई म्हणत हंबरडा फोडताच भल्ला यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. या वेळी साहाय्यक सुरक्षा अधिकारी महेश चौधरी, गस्त अधिकारी लवकुश चव्हाणही तेथे आले. त्यांनी, मुलींकडे चौकशी केली.एक दोन वर्षांची तर दुसरी तीन वर्षांची मुलगी होती. दोघीही दिव्यांग. दोघींकडे भजी, चिवडा आणि बिस्किटे होती. त्यापैकी मोठीने स्वत:चे नाव लक्ष्मी तर बहिणीचे नाव जया असे सांगितले. मात्र त्या कोठून आल्या? आई-वडील कुठे आहेत? याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. उलट ‘आई कुठे? मला आई पाहिजे,’ म्हणत तिनेच रडायला सुरुवात केली.
मुलींच्या पालकांना शोधण्यासाठी सुरक्षारक्षकांनी रुग्णालय परिसर पिंजून काढला. लहान मुलांचे वॉर्ड तपासले. मात्र त्यांच्या पालकांबाबत काहीही माहिती मिळाली नाही. मुलींना दूध, चॉकलेट देत त्यांनी शांत केले आणि सायन पोलिसांना कळविले. पोलिसांनी दोघींना पोलीस ठाण्यात नेत विचारपूस केली. मात्र, त्यांना नावांशिवाय काहीही माहिती देता न आल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत.पालकांनीच त्या मुलींना तेथे सोडून दिल्याच्या संशयावरून सुरक्षारक्षक भल्ला यांच्या फिर्यादीवरून पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने या प्रकरणातील अधिक तपास सुरू आहे.
नायरच्या घटनेमुळे सतर्कनायर रुग्णालय येथील बाळ चोरी प्रकरण ताजे असताना, या मुली अशा बाळ चोरांच्या हाती लागू नयेत म्हणून त्यांना वेळीच ताब्यात घेणे गरजेचे होते. म्हणून आधी मुलींना ताब्यात घेत, याबाबत पोलिसांना कळविल्याचे भल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.