Join us

दोन मुलांचा खून केल्याच्या खटल्यातून मातेची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:42 AM

राधाबाई गाबाजी रोकडे या मुंगसरे (ता. व जि. नाशिक) गावातील महिलेस सत्र न्यायालयाने ३२ वर्षांपूर्वी ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली आहे.

मुंबई : ज्ञानेश्वर (३ वर्षे) आणि रुपाली (दीड वर्ष) या आपल्या दोन मुलांचा विहिरीत फेकून खून केल्याच्या खटल्यात राधाबाई गाबाजी रोकडे या मुंगसरे (ता. व जि. नाशिक) गावातील महिलेस सत्र न्यायालयाने ३२ वर्षांपूर्वी ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली आहे.इतकी वर्षे जामिनावर असलेल्या राधाबाईचे केलेले अपील मंजूर करून न्यायालयाने त्यांची सुटका केली. दि. ८ जून १९९७या दिवशी तिने स्वत:च्याच शेतातील विहिरीत आधी मुलांना फेकले व नंतर स्वत:ही पाण्यात उडी मारली, असा तिच्यावर आरोप होता. मात्र त्या दिवशी मुसरळधार पाऊस पडत होता, सर्वकडे खूप चिखल व निसरडे झाले होते. शिवाय विहिरीला कठडाही नव्हता. हे लक्षात घेता मुलांना विहिराकडे घेऊन गेलेली राधाबाई पाय घसरून विहित पडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.राधाबाईचा सासरी खूप छळ होत होता. त्याला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असेही अभियोग पक्षाचे म्हणणे होते. मात्र राधाबाईचे पती गाबाजी व वडील हौशिराम जाधव यांनी दिलेल्या साक्षी पाहता घटनेच्या या पैलूतील पार हवाच निघून जाते, असेही न्यायालयाने नमूद केले.आशाबाई दगडू लैंज, देवराम किसन राऊत आणि शिवराम नामदेव गिरांडे अभियोग पक्षाच्या तीन प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने राधाबाईला दोषी ठरविले होते. शेजारच्या नवले यांच्या शेतात आपण बकऱ्या चारत असता राधाबाई दोन्ही मुलांना फरफटत विहिरीकडे घेऊन जात असताना व मुलांना आधी फेकून नंतर तिने विहिरीत उडी मारल्याचे आपण पाहिले, असे आशाबाईने सांगितले होते. तर आशाबाईने केलेला ओरडा ऐकून आपण विहिरीकडे धावलो व राधाबाई आणि तिच्या मुलांना बाहेर काढले. मीच मुलांना विहिरीत फेकले. मला वाचवू नका. मला जगायचे नाही, असे बाहेर काढताना राधाबाई ओरडत होती, असे देवराम व शिवराम यांचे म्हणणे होते.कोटाने विचारलेले प्रश्न- राधाबाईने आधी मुलीला विहिरीत फेकले. तेवढ्यात मुलगा घाबरून पळाला पण राधाबाईने त्याला पुन्हा खेचून आणत विहिरीत फेकले, असे आशाबाई सांगते. पण एवढे सर्व होईपर्यंत ती गप्प का बसली? तिघेही विहिरीत पडल्यानंतर मगच तिने आरडाओरड का केली?-राधाबाई विहिरीपासून सुमारे २०० मीटर अंतरावर होती. मुसळधार पाऊस पडत असताना व सभोवताली द्राक्षाची घनदाट बाग असूनही एवढया लांबून तिला सर्व स्पष्ट कसे दिसले?-बाहेर काढले तेव्हा दोन्ही मुले मेलेली होती व नाकातोंडात पाणी जाऊन राधाबाई बेशुद्ध पडली होती, असे देवराम व शिवराम उलटतपासणीत सांगतात. मग मला बाहेर काढू नका, मला मरायचे आहे, हे राधाबाईने त्यांना बाहेर काढताना सांगणे कसे शक्य आहे?- मी विहिरीत उडी मारली, असे देवराम व शिवराम दोघेही सांगतात. पण दोघेही दुसºयाचा उल्लेख करत नाहीत. खरंच दोघांनी विहिरीत उडी मारली का, याविषयीच संशय येतो.