मुंबई : लॉकडाऊन नंतर दोन तीन दिवसांनी सर्वजण जेवत होतो तेव्हा आईने विचारले आपल्या ताटात अन्न आहे पण बेघर, गरजूंचे काय असा सवाल आईने विचारला. आपण काहीतरी करावे असा मनात विचार सुरू होता. आईला तात्काळ होकार दर्शवत दोन ते तीन दिवसात मालाची जमवाजमव केली आणि एक एप्रिल पासून अन्न वाटप सुरू केले.आता दररोज १५०० हुन अधिक लोकांना अन्नवाटप करण्यात येत आहे असे ग्रेट पंजाब रेस्टॉरंटचे ध्रुवीर गांधी यांनी सांगितले
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगार नसल्याने गरिबांची उपासमार होते आहे. त्यामुळे गरीब ,गरजूंना अन्न वाटपासाठी आहारमधील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटने पुढाकार घेतला आहे. याबाबत ध्रुवीर गांधी यांनी सांगितले की, गरीब ,बेघरांची उपासमार होऊ नये म्हणून आम्ही रोज दीड हजार जेवण वाटप करत आहोत. जेवणात खिचडी, पुलाव किंवा चपाती भाजीचा समावेश असतो. सकाळी ८ ते १२ दरम्यान जेवण तयार करण्यात येते त्यानंतर अन्न पुरवठा केला जातो. जेवण बनविताना स्वछतेची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. तसेच अन्न वितरण करताना ग्लोव्हज मास्क आणि सुरक्षेची काळजी घेतली जाते. वांद्रे , परळ , धारावी परिसरात अन्न वाटप करण्यात येते, तसेच एका फूड पॅकेट स्वयंसेवी संस्थेला देण्यात येते. या व्यतिरिक्त लालबाग येथे बांधकाम कामगारांना फूट पॅकेट वाटण्यात आले. तर आहारचे उपाध्यक्ष विवेक नायक म्हणाले की, सायन रुग्णालयात लॉकडाऊननंतर सायन रुग्णालयातील कँटीन बंद होते. जेवायची सोय नसल्याने काही डॉक्टर पाण्यासोबत बिस्कीट खात आहेत. त्यांना जेवणाची सोय नाही असे एका मित्राने सांगितले. त्यावर आहारच्या माध्यमातून सायन रुग्णालय जेवण पुरविण्यात येत असून वडाळा येथील अकवर्थ रुग्णालयातही जेवण पुरविले जात आहे. त्याशिवाय इतर ठिकाणाहून जशी मागणी होईल तसा अन्न पुरवठा केला जात आहे. तर माटुंगा येथील उडप्पी हॉटेलचे सतीश नायक यांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची मदत लागली तर कळवा असे पालिका अधिकाऱ्यांना आम्ही सांगितले होते. त्यानुसार एका ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी ३०० सुसज्ज खाटाची आवश्यकता होती. आहारच्या माध्यमातून आम्ही ७५ खाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले.