Join us

कडक सॅल्यूट! कोरोनाच्या संकटात माय-लेकराची थाळी भरते रोज 150 भुकेल्यांची पोटं

By सायली शिर्के | Published: November 06, 2020 3:21 PM

Harsh Mandavia And Heena Mandavia : हर्ष मांडविया आणि त्यांची आई हिना मांडविया यांनी लॉकडाऊनमध्ये गरजुंसाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 84 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,24,985 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. हातावरचं पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच अनेकांनी गरीबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आता समोर आली आहे. 

कोरोनाच्या काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी एका माय लेकराची जोडी तत्पर असलेली पाहायला मिळत आहे. दररोज तब्बल 150 लोकांचं ते पोट भरत आहेत. हर्ष मांडविया आणि त्यांची आई हिना मांडविया यांनी लॉकडाऊनमध्ये गरजुंसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून हिना मांडविया यांनी मुंबईतील कांदिवली परिसरात "हर्ष थाली अँड पराठा" या नावाने एक डिलिव्हरी किचन सुरू केलं आहे. मात्र आता कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये अनेक गरजू लोकांसाठी अन्नाची सोय केली आहे. गरिबांसाठी ते फूड पॅकेट वाटत आहेत. 

गरीबांमध्ये तयार केलेल्या पदार्थांचं केलं जातं वाटप 

हिना मांडविया या दररोज गरीबांसाठी मोठ्या प्रमाणात जेवण तयार करतात. किचन योग्य पद्धतीने सॅनिटाईझ करून अन्नपदार्थ तयार केले जातात. योग्यरित्या काळजी घेतली जाते आणि त्यानंतर गरीबांमध्ये तयार केलेल्या पदार्थांचं वाटप केलं जातं. हर्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूड डोनेशनबाबत त्यांनी सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर देशभरातील लोकांनी देखील या चांगल्या कामाला उत्तम प्रतिसाद दिला. सुरुवातीला 11 हजार डोनेशन मिळाले.

पाच महिन्यांत तब्बल 13,000 लोकांना दिलं जेवण 

फूड डोनेशनला लोकांकडून चांगला प्रतिसाद आता मिळू लागला आहे. पाच देशांतील लोकांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 49 दिवसांत 3.2 लाख डोनेशन जमा केले. 'गेल्या पाच महिन्यांत तब्बल 13,000 लोकांना जेवण दिलं आहे. सोशल जमा झाले माध्यमातून आतापर्यंत आठ लाख जमा झाले आहेत. गेल्या 150  दिवसांत 13 हजार मिल्स, 37 हजार तवा रोटी आणि सहा हजारांपेक्षा अधिक घरी तयार करण्यात आलेली मिठाई वाटण्यात आली आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि इतर संस्थांमध्ये जाऊन तिथे घरी तयार केलेली सुगर फ्री मिठाई देखील वाटण्यात आल्याचं' हर्ष यांनी म्हटलं आहे. 

फूड डोनेशनला लोकांकडून चांगला प्रतिसाद 

"हातवरचं पोटं असणाऱ्या लोकांना गेल्या काही महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. असे अनेक गरीब लोक रोज जेवण्यासाठी येत असतात. यामध्ये रिक्षा चालक, ड्रायव्हर्स यांच देखील समावेश असतो. जेवण जेवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळतो" अशी माहिती हर्ष यांनी दिली आहे. हर्ष आणि हिना मांडविया यांनी कोरोनाच्या काळात घेतलेल्या पुढाकारचं अनेकांनी भरभरून कौतुक केलं आहे. तसेच सोशल मीडियावर या संदर्भात अनेक फोटो आणि व्हिडीओ हे पोस्ट केले आहेत. अनेकांनी आपआपल्या परिने यांना मदतीचा हात दिला आहे. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई