ठळक मुद्देसुलताना खान (३२), तेशीन खान (१८) अशी या दोघींची नावे आहेत. मायलेकी सध्या सुखरूप असून सुलतानाच्या म्हणजेच आईच्या हिम्मतीची आणि मायेचे कौतुक केले जात आहे.
मुंबई - धारावी परिसरात सापाने दंश केलेल्या मुलीला वेळीच उपचार मिळावे यासाठी आईने अतोनात प्रयत्न केले. त्यामुळे मुलीचे प्राण वाचले. मुलीला सापाने दंश केल्यानंतर आईला दंश केला. मात्र, आईने मुलीला घेऊन जीवाची बाजी लावत रुग्णालय गाठले. सुलताना खान (३२), तेशीन खान (१८) अशी या दोघींची नावे आहेत. सध्या दोघींवर सायनच्या लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धारावीच्या राजीव गांधीनगरमध्ये सलीम पत्नी सुलताना आणि मुलगी तेशीन सोबत राहतात. रविवारी मुंबईत पाऊस पडत असताना दुपारच्या सुमारास सुलताना आणि तेशीन घरी झोपल्या होत्या. दरम्यान, घरात एका कोपऱ्यातून आलेल्या एका सापाने तेशीनला दंश केला. त्यावेळी तिने केलेल्या आरडा ओरडानंतर सुलताना यांना जाग आली. साप तेशीनाच्या नजीक असल्याचे पाहून सुलताना घाबरल्या. तेशीनाला सापापासून दूर नेत असताना सापाने सुलतानालाही दंश केले.
सर्पदंश केल्यानंतर तेशीनाला अस्वस्थ वाटू लागले. तात्काळ सुलताना यांनी स्वतःला झालेल्या सर्प दंशाची पर्वा न करता तेशीनाला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसरीकडे सापाने सुलताना यांनाही दंश केल्याने त्यांचीही प्रकृती खालावत होती. त्या अवस्थेत सुलताना यांनी टॅक्सीने शीव रुग्णालय गाठत तेशीनाला रुग्णालयात दाखल केले आणि त्या बेशुद्ध पडल्या. काही तासानंतर शुद्धीवर आलेल्या सुलताना यांनी डाॅक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. मायलेकी सध्या सुखरूप असून सुलतानाच्या म्हणजेच आईच्या हिम्मतीची आणि मायेचे कौतुक केले जात आहे.