Mumbai Crime :मुंबईतल्या एका हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. भावाची हत्या केल्याच्या प्रकरणी तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षदर्शी आईने आपली साक्ष फिरवल्यानंतरही कोर्टाने आरोपी भावाला कठोर शिक्षा सुनावली आहे. २०१८ च्या या प्रकरणात धाकट्या भावाला मोठ्या भावाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यामुळे या प्रकरणाची सत्र न्यायालयात चर्चा सुरु आहे.
आरोपी हेमंत देवरुखाकर (३३) याने त्याचा मोठा भाऊ साईनाथ (३२) याची हत्या केली होती. साईनाथच्या मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन, गुटखा खाणे, घरात थुंकणे या सगळ्या गोष्टींना कंटाळला होता. साईनाथ आईलाही शिवीगाळ आणि मारहाण करायचा. याच रागातून हेमंतने साईनाथची हत्या केली होती. साईनाथच्या हत्येनंतर त्याच्या आईने हेमंतविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र कोर्टात तिने आपली साक्ष फिरवली. आपण ती अशिक्षित असून पोलिसांनी काय लिहीले होते याची माहिती नव्हती, असा जबाब आरोपीच्या आईने दिला.
आरोपी हेमंत घटनास्थळावरून पळून गेल्याच्या आईच्या युक्तिवादासह पुराव्यांवरुन न्यायाधिशांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना सकाळी ७ वाजता घडली. "फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, साईनाथशी पूर्वी झालेल्या वादातून आरोपीने जाणूनबुजून त्याच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आरोपीने साईनाथचा जाणूनबुजून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे," असे न्यायाधिशांनी सांगितले.
सरकारी वकील अश्विनी रायकर यांनी सहा साक्षीदारांचे म्हणणे कोर्टासमोर मांडले होते. पोलिसांना दिलेल्या जबाबात हेमंत आईने सांगितले की, "माझ्या मुलींचे लग्न झाले असून, मी माझ्या दोन अविवाहित मुलांसोबत राहत होती. साईनाथ एका डेअरीवर आणि हेमंत भजन मंडळात काम करायचा. साईनाथला तंबाखू, गुटखा आणि बिडीचे १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून व्यसन होते. माझा धाकटा मुलगा हेमंत आणि मी हे वागणे सहन करू शकत नव्हतो. जेव्हा मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचे तो शिवीगाळ करुन मारहाण करायचा. त्याच्यावर ठाणे मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरी तो मादक पदार्थांचे सेवन करुन मला मारहाण करायचा."
"१३ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७ वाजता कोणती तरी वस्तू पडल्याच्या आवाजाने आणि कोणीतरी माझ्या पायावर पाय दिल्याने मला जाग आली. मी माझा धाकटा मुलगा हेमंत माझ्यासमोर उभा असल्याचे पाहिले. मी त्याला असे का केले विचारले तेव्हा त्याने सततची भांडणे थांबण्यासाठी साईनाथला मारल्याचे सांगितले. मला ते ऐकून धक्का बसला आणि मी उठवण्याचा प्रयत्न केला. माझा धाकटा मुलगा हेमंत याने साईनाथच्या डोक्यावर सिमेंटचा जड ब्लॉक मारून जखमी केल्याचे मी पाहिले. त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त वाहत होते. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर हेमंत घर सोडून पळून गेला. साईनाथला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला," असे त्याच्या आईने सांगितले होते.