आईनेच चिमुरडीला कचराकुंडीत फेकले

By admin | Published: August 5, 2015 12:38 AM2015-08-05T00:38:12+5:302015-08-05T00:38:12+5:30

हिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईने सहा दिवसांच्या मुलीला कचराकुंडीत फेकून देण्याची धक्कादायक घटना कुर्ला कुरेशी नगर येथे घडली.

The mother thrown into the trash | आईनेच चिमुरडीला कचराकुंडीत फेकले

आईनेच चिमुरडीला कचराकुंडीत फेकले

Next

समीर कर्णुक , मुंबई
पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईने सहा दिवसांच्या मुलीला कचराकुंडीत फेकून देण्याची धक्कादायक घटना कुर्ला कुरेशी नगर येथे घडली. मात्र रहिवासी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलीचे प्राण वाचले असून सध्या तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चुनाभट्टी पोलिसांनी या प्रकरणी आईला अटक केली आहे.
मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी सुग्रा उमर शेख (२२) ही आरोपी महिला काही दिवसांपूर्वीच बाळंतपणासाठी कुरेशी नगरात तिच्या भावाकडे आली होती. २६ जुलैला एका खासगी रुग्णालयात तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने ती मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे ३१ जुलैला पहाटे तिने या मुलीला कपड्यात गुंडाळून याच परिसरातील कचराकुंडीत टाकले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही मुलगी रडत असल्याने तिचा आवाज परिसरातील एका रहिवाशाने ऐकला. त्याने कचराकुंडीजवळ जाऊन पाहिले असता, ही मुलगी रडत असल्याचे त्याला दिसले. याबाबत त्याने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, ही चिमुरडी जिवंत असल्याचे समजले. पोलिसांनी या मुलीला सायन रुग्णालयात दाखल करून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तपासासाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय नायकवडी यांनी चार पथके तयार केली. त्यात त्यांनी काही महिला अधिकारी आणि शिपायांना सामील केले. या पथकांनी परिसरात फिरून सात-आठ दिवसांत कोणी महिला बाळंत झाली आहे का? याची चौकशी केली. २ आॅगस्टला एक साध्या वेशातील महिला पथक काही महिलांमध्ये जाऊन गप्पा मारत असताना सुग्रा नावाच्या महिलेने काही दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ तिचे घर शोधून काढले. ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा तिने हा सगळा प्रकार फेटाळून लावला. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली.
मानसिक तणावातून तिने हे कृत्य केल्याचे तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना सांगितले. मात्र दुसरीही मुलगीच झाल्याने पती आणि सासरची मंडळी त्रास देतील, या कारणाने तिने या मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याची कुजबुज रहिवाशांमध्ये आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

Web Title: The mother thrown into the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.