आई, कुठे कुठे शोधू मी तुला? ‘ती’ आई समजून दोन वर्षे दुसरीशीच साधत होती संवाद...
By मनीषा म्हात्रे | Published: January 4, 2024 10:34 AM2024-01-04T10:34:31+5:302024-01-04T10:37:51+5:30
आईवेड्या त्या तरुणीने त्यावर विश्वास ठेवला; परंतु दोन वर्षांनी खरा प्रकार उघडकीस आलाच. ती अभागी तरुणी अजूनही आईचा शोध घेतच आहे.
मुंबई : आईपासून दुरावलेल्या त्या तरुणीला मातृभेटीची आस लागली होती. आपली जन्मदात्री भेटत नाही, या विचारानेच ती सतत अस्वस्थ राहत होती. संबंधित संस्थेकडे तिने तगादा लावला होता. अखेरीस संस्थेतील एका महिलेलाच तिची आई म्हणून उभे केले. आईवेड्या त्या तरुणीने त्यावर विश्वास ठेवला; परंतु दोन वर्षांनी खरा प्रकार उघडकीस आलाच. ती अभागी तरुणी अजूनही आईचा शोध घेतच आहे.
नागपूरमधून दत्तक घेतलेल्या नेदरलँडच्या ४५ वर्षीय महिलेची ही कहाणी आहे. दत्तक देणाऱ्या संस्थेद्वारे आई म्हणून दुसऱ्याच महिलेशी तिचा संपर्क करून दिला. दोन वर्षे आई म्हणून तिची भेट घेत असे. तिच्या भावना व्यक्त करायची. अखेर, याबाबत ॲड. अंजली पवार यांना समजताच त्यांनी डीएनएबाबत चौकशी केली. मात्र, डीएनए चाचणी झालीच नसल्याचे समजताच त्यांनी महिलेशी संवाद साधला. मात्र, ती तिची आई नसल्याची खात्री होताच ॲड. पवार यांनी संस्थेकडे उलटतपासणी सुरू केली. तेव्हा, ती महिला संस्थेत काम करणारी असून, परदेशी तरुणी आईबाबत खूप अस्वस्थ होत असल्याने त्यांनी तिलाच आई म्हणून समोर आणल्याची सारवासारव संस्थेने केली. हे समजताच नेदरलँडच्या त्या तरुणीला धक्काच बसला. ती मुलगी मूळची वर्ध्याची होती. तिची आई कामगार असल्याचे समजते. २००८ मध्ये हे प्रकरण संस्थेकडे आले होते. कामगार असल्याने ती कुठे निघून गेली असण्याची शक्यता असून, मात्र आजही तिची शोधमोहीम सुरू आहे.
अविवाहित, प्रेम प्रकरणातील फसवणूक, अनैतिक संबंध, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे या मुलांना संस्थेत सोडले जाते. आजही बेकायदेशीररीत्या दत्तक प्रक्रिया सुरू आहे. त्यावर हवे तसे कुणाचे नियंत्रण नाही. दत्तक कायद्यामध्ये आणखी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
- ॲड. अंजली पवार, संचालिका ॲडॉप्टी काउन्सिल, पुणे
काराचे तत्कालीन अध्यक्षही जाळ्यात
सीबीआयने बेकायदेशीर मूल दत्तक रॅकेटमध्ये मार्च २०११ पुण्यातील प्रीत मंदिर संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त जोगिंदर सिंग भसीन, त्यांची पत्नी महिंदर आणि मुलगा गुरप्रीत यांच्यासह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यासोबतच बाल दत्तक संसाधन एजन्सीचे (कारा) माजी अध्यक्ष जैनेंद्र कुमार मित्तल यांच्यावरही कारवाई झाल्याने खळबळ उडाली.
काराच्या संकेतस्थळावर नंबरची हेराफेरी?
परदेशी, तसेच भारतीय नागरिकांना मूल दत्तक घ्यायचे असल्यास काराच्या अधिकृत संकेस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्जानुसार संबंधितांना क्रमांक मिळतो. मात्र, हा क्रमांकही वर-खाली होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे ॲड. अंजली पवार सांगतात.