बाळाच्या जन्मानंतर ९ दिवसांनी आईचा मृत्यू, अपघाती मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:19 AM2017-10-27T02:19:03+5:302017-10-27T02:19:09+5:30
मुंबई : भांडुप येथील श्रेणिक रुग्णालयात बाळाला १६ आॅक्टोबरला जन्म दिल्यानंतर आई कोमात गेली. प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले.
मुंबई : भांडुप येथील श्रेणिक रुग्णालयात बाळाला १६ आॅक्टोबरला जन्म दिल्यानंतर आई कोमात गेली. प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. नऊ दिवस दीपा मौर्य यांनी डेंग्यूशी झुंज दिल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
दीपा यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्या कोमामध्ये गेल्या होत्या. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रेणिक रुग्णालयात दीपा यांना डेंग्यू झाल्याचे निदान करता आले नाही. तसेच, उपचारातही दिरंगाई केली, त्यामुळे दीपा यांची तब्येत आणखी खालावली. दीपा यांनी जन्म दिलेल्या बाळालाही जन्मत: डेंग्यू झाला. हे बाळदेखील अत्यंत नाजूक अवस्थेत असून, तेदेखील मृत्यूशी झुंज देत होते. पण, आता या बाळावर दुसºया रुग्णालयामध्ये एन.आय.सी.यू.त उपचार सुरू आहेत. फक्त ९ दिवसांच्या या बाळाचे प्लेटलेट्स दोन लाखांच्या ऐवजी ७४ हजार झाले होते. ज्यामुळे या बाळाची प्रकृती चिंताजनक झाली होती. या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी हे व्हेंटिलेटर काढण्यात आले. त्याची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली आहे.
कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह
घेणार नाही
दीपा यांचा मृत्यू डेंग्यूमुळे नाही, तर श्रेणिक रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्यवेळी न केलेल्या उपचारांमुळे झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांने केला आहे.
श्रेणिक रुग्णालयातील डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका दीपा मौर्य यांची नातेवाईक शीतल मौर्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.