जन्माचा आनंद क्षणिक, मातेचा करुण अंत; डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यूचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:56 AM2023-07-11T05:56:00+5:302023-07-11T05:56:32+5:30

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पायधुनी पोलिसांत सोमवारी तक्रार अर्ज देऊन संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

Mother's death within hours of delivery, family alleges death due to doctor's negligence | जन्माचा आनंद क्षणिक, मातेचा करुण अंत; डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यूचा आरोप

जन्माचा आनंद क्षणिक, मातेचा करुण अंत; डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यूचा आरोप

googlenewsNext

मुंबई - बाळाच्या आगमनाने मातेसह संपूर्ण कुटुंब आनंदून गेले. मुलाच्या भविष्याची स्वप्न रंगवत असतानाच मातेने डोळे मिटले ते कायमचेच....मुलाला जन्म देऊन काही तास उलटत नाही तोच मातेचा करुण अंत झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पायधुनी पोलिस अधिक तपास करत आहेत.

माझगावची रहिवासी असलेल्या प्रज्ञा रोहन केदारे- लोखंडे (३०) हिचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले. लग्नानंतर ती ठाकुर्ली येथे पती आणि सासरच्या मंडळीसोबत राहण्यास गेली. प्रज्ञा गर्भवती राहिली. बाळाच्या आगमनाच्या चाहुलीने सर्वच जण आनंदात होते. ८ जुलैला प्रसूतिकळा सुरू झाल्याने कुटुंबीयांनी प्रज्ञाला सायंकाळी सहाच्या सुमारास मोहमद अली रोड येथील नूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नवीन पाहुणा येणार या एकाच विचाराने घरातील मंडळी आनंदात होती. ९ जुलैच्या मध्यरात्री दोन वाजता प्रज्ञाची सीझेरिअन पद्धतीने प्रसूती झाली. त्यानंतर डॉक्टर निघून गेले. बाळ व्यवस्थित होते. आईची प्रकृतीही व्यवस्थित होती.

प्रज्ञाच्या रात्रभर कुटुंबीयांसोबत गप्पा रंगल्या. मात्र या गप्पा अखेरच्या ठरल्या. सकाळी ६ च्या सुमारास लघवीच्या जागेतून रक्तस्राव सुरू झाला. त्रास वाढल्याने तिने डॉक्टरांना सांगितले. मात्र, डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. प्रसूती करणारे डॉक्टर रुग्णालयात आले नाही. सकाळी ८.३० च्या सुमारास डॉक्टरांनी नूर रुग्णालयात फोन करून तेथील नर्सला औषध आणि इंजेक्शन देण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, असा आरोप प्रज्ञाचा भाऊ तुषार लोखंडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत केला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पायधुनी पोलिसांत सोमवारी तक्रार अर्ज देऊन संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

फाइल देण्यास टाळाटाळ

नूर रुग्णालय प्रशासनाने बहिणीची फाइल देण्यास टाळाटाळ केली. काहीवेळाने रिकामी फाइल सोपवली. ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तासाभराने फाइल देण्यात आली. मात्र, यादरम्यान त्यांनी रिपोर्ट आणि पेपर बदल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

अहवालाची प्रतीक्षा...

रुग्णाची योग्य ती काळजी घेत प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर रुग्ण व्यवस्थित होते. रुग्णाची स्थिती बघूनच डॉक्टर बाहेर पडले. त्यानंतर अचानक झालेल्या मृत्यूबाबत आम्हीही माहिती घेत आहोत. मात्र, यात कुठेही डॉक्टरांचा निष्काळजीपणा नाही. - डॉ. रेहान अहमद, सीएमओ, नूर हॉस्पिटल

Web Title: Mother's death within hours of delivery, family alleges death due to doctor's negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.