आईच्या मायेने विकास करणार

By Admin | Published: December 28, 2016 10:55 PM2016-12-28T22:55:27+5:302016-12-28T22:55:27+5:30

सुरेखा खेराडे : चिपळूणच्या विकासात कोणतीही अडचण येणार नाही

Mother's development will be developed | आईच्या मायेने विकास करणार

आईच्या मायेने विकास करणार

googlenewsNext

चिपळूण : शहरातील जनतेने आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. ही मोठी जबाबदारी आहे. शहराच्या विकासासाठी काम करताना प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करताना शहराची आई म्हणून काम करेन. प्रत्येकाचे मुलाप्रमाणे वेगवेगळे हट्ट असतील ते पुरवावे लागतील. हे शहर सर्वांचे आहे. त्यामुळे विरोध होणार नाही. आज आपण जसे सहकार्य केलेत तसेच सहकार्य पाच वर्ष केलेत तर शहर विकासासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. सर्वांनी हातात हात घालून काम करुया. शहराचा विकास व सुशोभिकरण करुया, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केले.
चिपळूण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे निशिकांत भोजने, तर स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे विजय चितळे, काँग्रेसचे हारुन घारे व शिवसेनेचे विकी नरळकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देताना पीठासन अधिकारी सुरेखा खेराडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मला विरोधी बाकावरील अनुभव आहे. परंतु, आता मी सत्तेत असल्याने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. मी कोणालाही विरोधक मानणार नाही. शहराच्या विकासासाठी काम करायचे आहे. आपण हट्ट करताना फार मोठा हट्ट करु नका की त्यापुढे मला झुकावे लागेल. सर्वांनी एकत्र येऊन काम करुया. म्हणजे पुढील ५० वर्षे आपले काम जनतेच्या लक्षात राहिल, असे त्या म्हणाल्या.
शिवसेनेचे गटनेते शशिकांत मोदी यांनी आज अतिशय मुद्देसूद भाषण करताना आपला अनुभव सिध्द केला. ते म्हणाले की, शहराच्या विकासासाठी कलाटणी देणारे हे वर्ष आहे. एका वेगळ्या परिस्थितीत निवडणूक झाली. आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. सुरेखाताई आपल्याला विरोधकांचे दु:ख माहीत आहे. आता सत्तेचे सुख तुमच्या पदरात पडले आहे. ही खुर्ची सुखाची, समाधानाची आहे तसेच ती काटेरीही आहे. जे विरोधक असतील, त्यांच्या हातात किंतु, परंतु असे मुद्दे जाणार नाहीत, याची खात्री आहे. आपण घरोघर फिरुन जनतेला शहर विकासाचे स्वप्न दाखवले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. पाच वर्षात आपण काय केले हे उगाळत न बसता, सर्वांशी समन्वय साधून काम करायला हवे.
अतिशय चांगले चिपळूण आपल्याला घडवायचे आहे. कोणी कोणाला पाठिंबा दिला, हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही सर्वांच्या लक्षात राहाल, असे काम करा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन काम केले तर शहराचा नक्की विकास होईल, असे सांगितले.
स्वीकृत नगरसेवक विजय चितळे म्हणाले की, गटनेते मोदींच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. प्रत्येक चांगल्या योजनेचे सभागृहात स्वागतच होईल. त्याचा पाठपुरावा आम्ही करू. सभागृहाचे कामकाज जाणणारे व विकासाची आस असणारे नगरसेवक निवडून आले आहेत. बारीकसारीक गोष्टींचा कीस काढण्यापेक्षा विकासाची कास धरूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवसेनेचे मोहन मिरगल म्हणाले की, शहराच्या विकासाकरिता प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तर काहीही अवघड नाही. काँग्रेसचे कबीर काद्री म्हणाले की, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया. आपण सर्वांनी चिपळूणकर म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम केले तर शहरात चांगले काम होईल. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. हा दुग्धशर्करा योग आहे. त्याचा लाभ नगराध्यक्षा म्हणून तुम्ही घ्या व शहराचा विकास करा. राष्ट्रवादीच्या वर्षा जागुष्टे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतानाच विकासासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
अपक्ष सीमा रानडे यांनीही शहर आपल्या सर्वांचे आहे. ते स्वच्छ व आरोग्यदायी राहण्याच्या दृष्टिने आपण सर्वांनी प्रयत्न करुया. पाच वर्षात सर्वजण नावाजतील, असे शहर निर्माण करुया, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)


भोजने : निवडणुकीतील विजयापेक्षा आनंदसुख-दु:खाचे समन्वय साधून सर्वांना न्याय द्या : शशिकांत मोदी
शहराचा विकास करणे ही जबाबदारी : मोहन मिरगल
आज निवडून आल्यापेक्षा जास्त आनंद झाला : निशिकांत भोजने
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व नगरसेवकांना शुभेच्छा : वर्षा जागुष्टे
चांगल्या सूचनांचे स्वागत.


इच्छा पूर्ण झाली..
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी सांगितले की, आपण निवडणुकीत निवडून आलो, तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद आज झाला आहे. शहराचा प्रमुख घटक म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा होती. आज ती पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे, असे भोजने म्हणाले.

Web Title: Mother's development will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.