- जान्हवी मोर्ये, डोंबिवलीतुमचे नातेवाईक किंवा मुलगामुलगी परदेशात असतील, तर त्यांना यंदाच्या दिवाळीला घरी आईआजीने बनवलेल्या फराळाची अस्सल चव चाखता येणार आहे. परदेशात कुरिअरद्वारे फराळ पाठवण्याची सुविधा आता डोंबिवलीतील काही विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिली आहे. परदेशात फराळ पाठवण्यासाठी अशा दुकानांमध्ये सध्या बुकिंगसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.डोंबिवलीतील सुनील शेवडे हेही संकल्पना राबवत आहेत. ते स्वत: फराळ बनवून तो परदेशात पाठवणे तसेच ग्राहकांनी त्यांच्या घरी बनवलेला फराळ परदेशात पाठवत आहेत. त्यासाठी त्यांनी एका कुरिअर कंपनीशी टायअप केले आहे. कुरिअरद्वारे फराळ पाठवण्यासाठी शनिवार, २२ आॅक्टोबर ते बुधवार, २६ आॅक्टोबरदरम्यान बुकिंग घेतले जाणार आहे, असे शेवडे यांनी सांगितले.ग्राहकांना घरी बनवलेला फराळ तीन ते सहा किलोच्या पॅकेजमध्ये पाठवता येईल. त्यासाठी प्रत्येक किलोला ६९९ रुपये कुरिअरचा दर आकारला जाईल. सात किलोनंतर प्रतिकिलोला ४९९ रुपये आकारले जातील. हा दर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया, सिंगापूर आणि दुबई या देशांपुरता मर्यादित आहे. इतर देशांत फराळ पाठवण्यासाठी तीन ते सहा किलोपर्यंत प्रतिकिलोला ९९९ रुपये व सात किलोच्या पुढील वजनाच्या फराळासाठी प्रतिकिलोला ७९९ रुपये दर आकारला जाईल. कमी फराळासाठी ग्राहकाला पैसे जास्त मोजावे लागतील. जास्त वजनासाठी ग्राहकाला कमी पैसे मोजावे लागतील. जास्त वजनाचा फराळ पाठवण्यात ग्राहकांचा फायदा असेल, असे त्यामागचे व्यावसायिक गणित आहे. घरी फराळ तयार करण्यासाठी वेळ नसलेल्यांसाठी तयार फराळांचे पॅकेजही बाजारात उपलब्ध आहेत. त्यात ‘ए’ व ‘बी’ असे दोन पॅकेज आहेत. ‘ए’ हॅम्पर हा फॅमिली पॅक, तर ‘बी’ हॅम्पर हा परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांच्या हॅम्पर पॅकमध्ये कंदील, रांगोळी, पणत्या या वस्तू दिल्या जाणार नाहीत. त्याऐवजी त्यांना लाडू व करंजीचे प्रत्येकी पाच नग जास्तीचे दिले जाणार आहेत. ‘ए’ व ‘बी’ हॅम्पर पॅकमध्ये चकली, चिवडा, शेव, शंकरपाळी, बेसन लाडू, गव्हाच्या पोह्याचा चिवडा, पाकातील चिरोटे, अनारसे, चॉकलेट शंकरपाळी, मसाला कोन, आंबा बर्फी असेल. ‘ए’ व ‘बी’ हॅम्परची किंमत प्रत्येकी ६ हजार ९९९ रुपये आहे. ‘सी’ प्रकारात ग्राहकांना त्यांनी घरी बनवलेला फराळ कुरिअर कंपनीद्वारे परदेशात पाठवता येईल. त्यात फराळ वजन करून ग्राहकांसमोर पॅक केला जाईल. ‘सी’ हॅम्परद्वारे यंदा २५० पेक्षा जास्त पॅकेट्स-बॉक्स परदेशात पाठवली जातील, असा अंदाज आहे. मागील वर्षी जवळपास १५०-१७५ पॅकेट्स-बॉक्स परदेशात पाठवले गेले होते.
आईच्या हातचा फराळ परदेशी
By admin | Published: October 23, 2016 3:37 AM