आईची शपथ आणि लकी एक्झिट! पथकासोबत जाण्यापूर्वी आईच्या त्या शब्दांमुळे तो ठरला सुदैवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 09:36 AM2023-04-17T09:36:41+5:302023-04-17T09:37:33+5:30
Mumbai News: मी गाडीत बसलो आणि तितक्यात आईचा फोन आला, मला म्हणाली तुला माझी शप्पथ गेलास तर... म्हणून मी मागे फिरलो आणि सकाळी अपघाताची बातमी पाहिली. तिला मिठी मारून ढसाढसा रडलो
मुंबई : मी गाडीत बसलो आणि तितक्यात आईचा फोन आला, मला म्हणाली तुला माझी शप्पथ गेलास तर... म्हणून मी मागे फिरलो आणि सकाळी अपघाताची बातमी पाहिली. तिला मिठी मारून ढसाढसा रडलो, हे सांगताना गोरेगावच्या आराध्य जाधव (१८) याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती.
आराध्यचे अनेक मित्र बाजीप्रभू ढोल-ताशा पथकात होते. तो वादक नसला तरी त्यांच्यासोबत पुण्याला निघाला होता. माझी आई सुखदा हिने मला परवा जाण्यापासून रोखले. मला अस्वस्थ वाटतेय असे म्हणाली. माझी आजी वारल्याने आम्ही त्या दुःखात आहोत. मी बसमध्ये जाऊन बसलो होतो; पण फोन करून तिने मला परत बोलविले. त्यामुळे मित्रांचा आग्रह मोडून घरी परतलो. रात्रभर आईशी भांडलो. तिने मला जाऊ दिले नाही म्हणून रागावलो होतो. मात्र सकाळी बसच्या अपघाताची बातमी समजताच पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची बातमी ऐकल्यानंतर आईला मी घट्ट मिठी मारली. आज माझे काय झाले असते, या विचारानेही माझा थरकाप उडाला. मृतांपैकी अनेकजण माझे मित्र होते. त्यांच्यापैकीच एक चेहरा मीदेखील असतो याचा विचारही हादरवून टाकतो. मात्र आईचे ऐकल्यामुळे आज मी सुखरूप आहे, असे आराध्य म्हणाला.
आम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहोत त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाला तारले, माझ्या पत्नीमार्फत त्याला अडवले असे म्हणत आराध्यचे वडील प्रशांत यांनी हात जोडत देवाचे आभार मानले.