आईचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर , धक्का लागून दहाव्या मजल्यावरून पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:40 AM2017-08-29T05:40:11+5:302017-08-29T05:40:20+5:30
सेल्फी आणि मोबाइलच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता मातेचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे.
मुंबई : सेल्फी आणि मोबाइलच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता मातेचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. हातातून निसटणारा मोबाइल सांभाळणाºया आईचा धक्का लागून १८ महिन्यांची मुलगी दहाव्या मजल्यावरून पडली. यात तिचा मृत्यू झाला.
अनू यादव असे मृत मुलीचे नाव असून गुरुवारी सायंकाळी ७च्या सुमारास अंधेरी पूर्वेच्या डोंगरी परिसरातील रिहाब कनकिया इमारतीत हा प्रकार घडला. दहाव्या मजल्यावर अनूची आई आरती (२७) तिला खिडकीजवळ घेऊन उभी होती. तेवढ्यात आरतीच्या हातातील मोबाइल निसटला. तो सावरण्यासाठी वाकली असताना अनावधानाने तिचा धक्का बेसावध उभ्या अनूला लागला आणि ती खाली कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
आरतीचे पती इस्टेट एजंट असून, त्यांची कुणाविरोधातही तक्रार नसल्याचे सांगितले. तर एमआयडीसी पोलिसांनीही हा अपघात असून, यात प्रथमदर्शनी संशयास्पद बाब आढळली नसल्याचे स्पष्ट केले.