Join us  

मोतीलाल नगर पुनर्विकासाला पुन्हा गती

By admin | Published: October 26, 2015 1:24 AM

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाला म्हाडाने पुन्हा गती दिली आहे. मोतीलाल नगरचा पुनर्विकास आराखडा बनवण्यासाठी म्हाडाने प्रकल्प नियोजन सल्लागाराची

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाला म्हाडाने पुन्हा गती दिली आहे. मोतीलाल नगरचा पुनर्विकास आराखडा बनवण्यासाठी म्हाडाने प्रकल्प नियोजन सल्लागाराची (पीएमसी) नेमणूक करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी मागविलेल्या निविदांकडे सल्लागार कंपन्यांनी पाठ फिरवल्याने म्हाडाने निविदांच्या काही अटींमध्ये बदल केला आहे.मोतीलालनगर १, २ आणि ३ टप्प्यांमध्ये वसले आहे. या वसाहतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने राबवता येईल का, पुनर्विकासातून निर्माण होणारी घरे, घरांचे क्षेत्रफळ आणि पुनर्विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रक्रिया राबवण्यासाठी म्हाडामार्फत यापूर्वी पीएमसी नेमणुकीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. पीएमसी निविदापूर्व बैठकीला ८ कंपन्यांनी प्रतिसाद दर्शवला होता. यामुळे मोतीलालनगरचा पुनर्विकासाचा आराखडा लवकरात लवकर बनवून पुनर्विकास प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी अपेक्षा म्हाडा अधिकाऱ्यांना होती.पण म्हाडाने निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुनर्विकासाचे काम ठप्प झाले होते. अखेर म्हाडाने निविदांच्या अटींमध्ये काही बदल करीत नव्याने पीएमसी नेमणुकीसाठी निविदा काढल्या आहेत. यापूर्वी कंपन्यांना दिलेल्या अटींमध्ये बदल केला असून, कंपन्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद लाभेल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.पीएमसीची नेमणूक झाल्यानंतर कंपनीला मोतीलाल नगरचा पुनर्विकासाचा आराखडा तयार करणे, प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी प्राप्त करणे, प्रकल्पाविषयीचा आर्थिक अहवाल देणे, पुनर्विकासाच्या विकासकांसाठी नियमावली तयार करणे आदी पुनर्विकास प्रक्रियेसंदर्भातील विविध कामे करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)