खार पाेलिसांकडून तपास सुरू : प्रियकरासह मैत्रिणीला १४ जानेवारीपर्यंत पाेलीस काेठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खारमधील विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजा हिच्या हत्येच्या उद्देशाबाबत पोलीस चौकशी करत असून अजूनही त्यात काही ठोस त्यांना सापडलेले नाही.
जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर व मैत्रीण दिया पडळकर यांना १४ जानेवारी, २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र तिच्या हत्येमागचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नसून मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचेही त्यातून समोर आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने रविवारी सीन रिकन्स्ट्रक्ट केला. मात्र त्यातही बऱ्याच गोष्टींचा ताळमेळ बसत नसल्याचे समाेर आले आहे. दुसरीकडे जान्हवीच्या मृत्यूवेळी नेमके काय घडले, याबाबत काहीच आठवत नसल्याचे जाेगधनकरचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी सायन रुग्णालयातील डॉक्टरांचाही जबाब नोंदविला, ज्यांच्याकडून जाेगधनकरने उपचार करून घेतले होते.
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जान्हवीच्या पालकांना तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून तिच्या लहान बहिणीने ‘जस्टीस फॉर जान्हवी’ ही मोहीम सुरू केली आहे.
...........................