मुंबई: हजारो गुंतवणूकदारांच्या शेकडो कोटींच्या रक्कमेचा अपहार करणा-या चिट फंड घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार महेश मोतेवार व त्याच्या नातेवाईकांच्या नावे आठ वेगवेगळ्या राज्यातील आणखी १५ मालमत्ता व बॅँकेच्या खात्यावर सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी टाच आणली. मुंबई, पुणेसह अन्य राज्यातून जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत १०१.३ कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मोतेवार दाम्पत्य गेल्या दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात असून त्यांच्याविरुद्ध देशभरात विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत त्यांची सुमारे ३०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
महेश मोतेवारने पुण्यात समृद्धी जीवन पशू खाद्य योजनेच्या नावाखाली मुख्यालय स्थापन केले. त्यासाठी देशभरातील हजारो शेतक-यांकडून गुंतवणूक जमा केली. त्यांच्याकडून हजारो कोटी रक्कम जमा करुन त्याचा परतावा दिला नाही. हा निधी बनावट कंपन्या स्थापन करुन अन्यत्र वर्ग केला. वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावाने फ्लॅट, भूखंडही त्याने खरेदी केले. या फसवणुकीप्रकरणी त्याच्याविरुद्ध मनी लॉण्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्यावर्षी त्याच्या, पत्नी लीना हिच्या मालकीची मुंबई व पुण्यातील कार्यालये, फ्लॅट तसेच अन्य राज्यातील २०७ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यात त्याच्या मालकीच्या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. त्याचे सर्व बॅँक खाती, व्यवहार सील करण्यात आली आहेत. मंगळवारी ईडीच्या पथकाने त्याची मुंबई, पुणे, गुजरात, कर्नाटक याठिकाणी खरेदी केलेले भूखंड, कार्यालये जप्त केली. त्याचप्रमाणे महेश व लीना यांच्या नावावरील विविध ५ बँकेतील खाती सील केली. या सर्व मालमत्तेची किंमत सुमारे शंभर कोटी ३ लाख रुपये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.