मुंबई - 26/11 मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व जनतेने पोलीस प्रशासन सन्मान करावा म्हणून पोलिसांच्या मुलांनीच मोटर सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. मुंबईसह राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 26 नोव्हेंबर रोजी ही मोटर सायकल रॅली काढून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाल् की, या रॅलीच्या माध्यमातून सामान्य जनतेला पोलिसांप्रती आदर व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. येत्या 26 नोव्हेंबरला पोलीस कर्मचारी दिसेल तिथे त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणावे असे आवाहनही या मोटरसायकल रॅलीदरम्यान करण्यात येणार आहे.
नायगांव पोलीस हुतात्मा मैदान येथून शांततेने रॅलीला सुरुवात होईल. परळ उड्डाणपुलावरून जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोरून कामा रुग्णालयाकडून मार्गस्थ होईल. येथे शहीद हेमंत करकरे व विजय साळसकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. तिथून गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाजवळ पोलीस जिमखाना येथे कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात सरकारी वकील उज्ज्वल निकम तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती दुबाले यांनी पुढे दिली.