मुंबई : चर्चगेट स्थानकात लोकल बफरवर आदळून झालेल्या घटनेत मोटरमनसह पाच प्रवासी जखमी झाले होते. या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून रेल्वे महाव्यस्थापकांना अहवाल सादर करण्यात आला असून, मोटरमन व गार्ड दोषी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. २८ जून रोजी भार्इंदरहून चर्चगेट स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर आलेली जलद लोकल बफरवर आदळली आणि मोठा अपघात झाला. रविवार असल्याने मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यासह प्रवाशांमधून व्यक्त करण्यात आली. या घटनेची चौकशी होईपर्यंत मोटरमन एल. एस. तिवारी आणि गार्ड अजय कुमार गुहेर यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर चौकशी करण्यासाठी रेल्वेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीकडून अपघातानंतर १० दिवसांत अहवाल सादर केला जाणार होता. मात्र अनेक तांत्रिक बाबी आणि अपघाताच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्यांचा जबाब नोंदवण्यास लागलेला वेळ यामुळे अहवाल सादर करण्यास उशीर झाला. या समितीकडून दोन दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आणि संबंधित विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला असून, यामध्ये मोटरमन तसेच गार्डवर ठपका ठेवण्यात आला आहे. चर्चगेट स्थानकात लोकलने प्रवेश केल्यानंतर ती वेळेत थांबवण्याचे नियम मोटरमन आणि गार्डकडून पाळण्यात आले नाहीत. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे या अहवालातून सांगण्यात आले आहे. यात मोटरमन व गार्ड दोषी असून, त्यांना सेवेतून काढून टाकण्यात यावे किंवा कायमचे निवृत्त करावे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मोटरमन व गार्ड ठरले दोषी
By admin | Published: July 23, 2015 2:16 AM