रेल्वे मार्गावर सिलिंडर असल्याचे पाहून लोकल थांबविणाऱ्या मोटरमनचा होणार सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:40 AM2019-11-14T01:40:33+5:302019-11-14T01:40:37+5:30
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर सिलिंडरने पेट घेत असल्याचे पाहून लोकल थांबविणाºया मोटरमन महेश परमार यांचा सत्कार केला जाणार ...
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर सिलिंडरने पेट घेत असल्याचे पाहून लोकल थांबविणाºया मोटरमन महेश परमार यांचा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सीएसएमटीहून सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३६ ची अंबरनाथ धिमी लोकल घेऊन मोटरमन परमार निघाले. सायन-माटुंगादरम्यान जलद मार्गावर सिलिंडर पेट घेत असल्याचे परमार यांनी पाहिले. रेल्वे रुळावरील कामगाराकडून लोकल थांबविण्याचा इशारा मिळताच परमार यांनी प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केला. तसेच घटनेची माहिती गार्ड सचिन गोडे यांना दिली.
लोकल आणि पेट घेत असलेल्या सिलिंडर यातील अंतर २०० मीटर राहिले होते. पेटत्या सिलिंडरवर लोकल आदळून स्फोट झाला असता तर अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. परमार यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने सत्कार केला जाईल.
आग विझविण्यासाठी मोटरमन केबिनमध्ये अग्निरोधक यंत्र असते. हे यंत्र कामगारांना देण्यात येणार होते, मात्र तत्पूर्वीच कामगारांनी सिलिंडरला लागलेली आग नियंत्रणात आणली. त्यानंतर सिलिंडर रुळांपासून दूर नेण्यात आला. याची माहिती कामगाराने देऊन पुढील प्रवास करण्याचा इशारा दिला, अशी माहिती महेश परमार यांनी दिली.