ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12- वसई ते नालासोपारा दरम्यान रेल्वे रूळावर मोटारमनला लोखंडी रॉड आढळून आला होता. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पण मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे त्या मार्गावर मोठी दुर्घटना टळली. मोटारमनला हा रॉड दिसल्यानंतर ते गार्डसह खाली उतरले आणि त्यांनी तो रॉड बाजूला केला. तसंच आरपीएफच्या पुढील चौकशीसाठी त्यांनी तो रॉड ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये ठेवला होता.
या घटनेमागे कोणत्याही प्रकारच्या घातपाताची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. चिंतेचं कोणतही कारण नाही. रेल्वेमधील हा रॉड नसून लोखंडी रॉड आहे. या रेल्वेरूळाच्या बाजूलाच एका पुलाच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे, हा रॉड तिथलाच आहे, असं स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आलं आहे. याप्रकरणी आरपीएफकडून पुढील चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान याआधी मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रेल्वेरूळावर लोखंडी रॉड आढळून आला होता. तसंच रेल्वेरुळावर रॉड ठेवणं हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केला होता . प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी म्हणजे २४ जानेवारीला रात्री मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्टेशनपासून 300 ते 400 मीटर अंतरावर रेल्वे रुळावर सात मीटर लांबीचा लोखंडी रॉड ठेवण्यात आला होता. मात्र लोको पायलट हरेंद्र कुमार यांना हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळं रात्री 10.40 ला येणा-या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. विशेष म्हणजे रात्री 10.23 ला कर्जत लोकल याच मार्गावरून रवाना झाली होती. त्यामुळं दरम्यानच्या १७ मिनिटांमध्येच हा घातपात घडवण्याच्या हालचाली केल्याचं समोर आलं आहे.