मुंबई : मोटरमनच्या आंदोलनामुळे शनिवारी लाखो प्रवासी वेठीला धरले गेले असतानाच रविवारी मेगाब्लॉक आणि सिग्नलमधील बिघाडामुळे लोकल वाहतूक पूर्णतः कोलमडली. डोंबिवलीहून दादरच्या ४० मिनिटांच्या प्रवासाला दोन तास पाच मिनिटे लागल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर मोटरमननी ओव्हरटाइम बंद करण्याचे आंदोलन मागे घेतल्याने सोमवारपासून वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
चुकीच्या पद्धतीने सिग्नल ओलांडल्याने एका मोटरमनने आत्महत्या केल्याचा आरोप करत मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी अचानक असहकार आंदोलन पुकारल्याने शनिवारी १४७ लोकल फेऱ्या रद्द झाल्या, तर त्यापेक्षा दुप्पट फेऱ्या विलंबाने धावत होत्या. रविवारी साडेचार तासांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक फेऱ्या रद्द झाल्या, काही गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात आल्या. त्याचवेळी विक्रोळी स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने जवळपास सव्वा ते दीड तास लोकल एकाच जागी थांबून होत्या. नंतर त्या कशाबशा सुरू झाल्या. पण ठिकठिकाणी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. परतीच्या प्रवासात भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे येथे फलाट प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.
चर्चेनंतर आंदोलन मागेमध्य रेल्वेच्या मोटरमननी जादा कामास नकार देत असहकार आंदोलन पुकारले. त्यामुळे सोमवारीही वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी रविवारी मोटरमन आणि मध्य रेल्वे प्रशासनात बैठक झाली. त्यात ओव्हरटाइम न करण्याचा निर्णय मोटरमननी मागे घेतला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. सिग्नल ओलांडण्याच्या नियमांत सुधारणा करण्याची मागणी रेल्वे मंडळापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
प्रवाशांचे म्हणणे रेल्वे प्रशासन ऐकणार काय? ऐन गर्दीच्या वेळी किंवा लोकल वाहतुकीला फटका बसत असल्याचे दिसत असूनही लांब पल्ल्याच्या आधीच रखडलेल्या गाड्यांना मार्ग मोकळा करून दिला जात असल्याने लोकल वाहतूक आणखी रखडते. खास करून अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, टिटवाळा, आसनगाव, कसारा येथून येणाऱ्या गाड्यांना याचा फटका बसतो. त्यामुळे मोजक्या प्रतिष्ठेच्या गाड्या वगळता अन्य मेल-एक्स्प्रेस थांबवून लोकल आधी पुढे काढाव्या.
वेगवेगळ्या कारणांमुळे गाड्या रद्द होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मध्य रेल्वेवर आधीच १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यातही आठवड्यातून तीन वेळा या गाड्या रद्द केल्या जातात. त्यांची वेळेत घोषणाही होत नाही. त्या गाडीऐवजी १२ डब्यांची पर्यायी गाडीही चालवली जात नाही. रात्री १२.२४ च्या कर्जत गाडीच्या आधी असलेली कुर्ला, नंतरची ठाणे आणि कुर्ला या लोकल वेळापत्रकात असूनही गेल्या काही महिन्यांत कोणतीही पूर्वसूचना न देता मध्ये रेल्वेने त्या गुपचूप बंद केल्या आहेत. पूर्वी मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पावणेतीन तास बंद होती. नंतर ती वेळ वाढवत सव्वा तीन तास करण्यात आली. आता काही गाड्या गुपचूप रद्द करून ही वेळ ३ तास ५४ मिनिटे करण्यात आली आहे. एसी लोकलच्या थांबण्याचा कालावधी साध्या लोकलपेक्षा अधिक आहे. त्यामुळे एसी लोकल थोडी जरी उशिरा आली, तरी मागून येणाऱ्या तीन ते चार गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते.