सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान 'माऊंट मेरी' जत्रेची उत्साहात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:08 PM2023-09-10T19:08:51+5:302023-09-10T19:09:05+5:30
यंदाची माऊंट मेरी जत्रा १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारपासून ही जत्रा सुरू होते.
-श्रीकांत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्व जातीधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध 'माऊंट मेरी' जत्रेची रविवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या जत्रेनिमित्त वांद्रे पश्चिम परिसरात मोठी जत्रा भरली जाते. तसेच नवसाला पावणारी माता, अशी ख्याती असल्याने चर्चेमध्ये माउंट मेरीच्या दर्शनाला लाखो भाविक दरवर्षी येत असतात. यंदा माऊंट मेरी जत्रेच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांनी तुफान गर्दी केली आहे.
यंदाची माऊंट मेरी जत्रा १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारपासून ही जत्रा सुरू होते. शतकाहून अधिक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान झाले आहे. त्यामुळे ही जत्रा सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे.
या जत्रेचे मुख्य आकर्षण माऊंट मेरी चर्च असून मदर मेरी जवळ नवस मागण्यासाठी येथे भाविक येतात. माऊंट मेरीसमोर नवसाप्रमाणे मिळणाऱ्या मेणबत्या अर्पण करून तसेच मेणबत्ती लावून नवस मागले जातात. नवस पूर्ण झालेल्याची मोठी गर्दी येथे असते. त्याचप्रमाणे चर्च प्रशासनाकडून विधिवत होणाऱ्या प्रार्थना, मार्च तसेच आशीर्वाद प्रार्थनेसाठी येथे मोठी गर्दी होते.
त्याचप्रमाणे माऊंट मेरी चर्च परिसरात भरणारी जत्रा अनेकांसाठी आनंदाची पर्वणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे फळाचा हलवा, पाक आणि मिठाई, लहानमुलांसाठी खेळणी, फुले, खाद्यपदार्थ आणि कृत्रिम दागिन्यांची विक्री करणारे असे स्टॉल येथे आहेत. त्याची खरेदी आणि आनंद घेण्यासाठी तुफान गर्दी येथे होते. त्यात महाविद्यालयीन मुला मुलींची संख्या सर्वाधिक असते. तरुणांचे हजारो ग्रुप येथे असतात. त्यामुळे रविवारी सकाळपासून वांद्रे रेल्वे स्थानकापासून माऊंट मेरी जत्रेला जाणाऱ्यांनी गर्दी केली होती.
चर्च प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा भाविकांच्या सोयीसुविधासाठी अनेक गोष्टीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शहरात पावसामुळे छान वातावरण आहे. त्यामुळे यंदाही जास्त गर्दी होण्याची शक्यता चर्चने व्यक्त केली. पहिल्याच दिवशी माऊंट मेरी जत्रेत प्रचंड गर्दी होती.