Join us

प्रतीक्षा नगरमध्ये समस्यांचा डोंगर; रहिवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 4:04 AM

रस्त्यांवर खड्डे, सांडपाणी, कचरा, धुळीचे साम्राज्य आणि गळके छत

योगेश जंगम 

मुंबई : विविध प्रकल्पांतील बाधित रहिवाशांना तात्पुरता निवारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने म्हाडाने संक्रमण शिबिरांची व्यवस्था केली आहे, मात्र या संक्रमण शिबिरांमध्येही असंख्य समस्या आणि अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. आपल्याला वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांमध्ये खितपत पडावे लागेल, या भीतीने रहिवासी जागा खाली करण्यास नकार देतात. यामुळे जीवितहानी घडण्याची दाट शक्यता निर्माण होते. डोंगरी येथील दुर्घटनेमुळे म्हाडाच्या संक्रमण शिबिरांच्या समस्येकडेही लक्ष वेधले गेले आहे. यानिमित्ताने सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचा घेतलेला हा आढावा. येथील रहिवासीही गटारे तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, सांडपाणी, आवारातील कचरा, तुटलेली डेÑनेज लाइन, छतगळती अशा असंख्य समस्यांनी त्रस्त झाले आहेत़ याकडे येथील रहिवाशांनी म्हाडा, महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे, मात्र अशा गंभीर समस्यांकडे म्हाडा आणि महापालिका प्रशासनाने दुर्लक्षच केले असल्याचे दिसत आहे.

प्रतीक्षानगर येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये ३ हजार ३०८ गाळे आहेत. १८०, ३२०, ४३७ आणि ५६० चौरस फूट असे येथील गाळ्यांचे क्षेत्रफळ आहे. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या संक्रमण शिबिरांमध्ये राहत असलेल्या रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी संक्रमण शिबिरांच्या आवारातील रस्त्यांची चाळण झाली आहे, तर येथील गटारे तुटल्याने परिसरामध्ये सांडपाणी पसरते, पावसाळ्यामध्ये आवारात गुडघाभर पाणी साचते, तर कचरा दररोज न उचलला गेल्याने कचऱ्याचे ढीग साचतात.

ड्रेनेज लाइन तुटल्याने पावसाळ्यात परिसरामध्ये गटाराचे पाणी तुंबते, यामुळे आवारात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास झाली आहे. परिसरामधील ड्रेनेज लाइन तत्काळ दुरुस्त कराव्यात जेणेकरून रहिवाशांना त्रास होणार नाही. - मंगेश म्हात्रे, स्थानिक रहिवासी

थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचते. आवारामध्ये झुडपेही वाढली आहेत, स्ट्रीट लाइटही नसतात. गर्दुल्ल्यांचाही या ठिकाणी वावर असतो. पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डास येतात. - संकेत पार्सेकर, स्थानिक रहिवासी

गटारे तुडुंब, सांडपाणी रस्त्यावरसायन प्रतीक्षानगर म्हाडा संक्रमण शिबिरातील इमारत क्रमांक टी-६५ लगत असणाºया रस्त्यावर गटाराचे पाणी साचले आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटाराच्या पाण्याने रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साठत आहे. याच रस्त्यावरून या इमारतीतील रहिवाशांना ये-जा करावी लागत आहे. यावर तातडीने तोडगा काढा, अशी मागणी इमारत क्रमांक टी-६५ च्या रहिवाशांकडून होत आहे.

नागरिकांची बिकट वहिवाटच्येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तांडेल कान्होजी आंग्रे उद्यानाजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सतत वर्दळीच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीच्या असणाºया या रस्त्यावर चिखलाचे आणि साचलेल्या पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे डबके साचलेले असल्याने चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना आणि स्थानिक नागरिकांना घर गाठावे लागत आहे.

प्रतीक्षानगर येथील तांडेल कान्होजी आंग्रे उद्यानाच्या येथून प्रतीक्षानगर कॅम्प क्रमांक २ आणि ३ जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यासोबत काळी मातीही रस्त्यावर आली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर या रस्त्याची वाईट अवस्था असते.

रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याने पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांतील चिखल विद्यार्थ्यांच्या अंगावर उडतो. यामुळे या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चिखलाचा त्रास तर इतर वेळी धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. - चंद्रकांत राणे, स्थानिक रहिवासीधुळीचे साम्राज्य

येथील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उखडलेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ सुवर्ण क्रीडा मंडळ समाज मंदिर हॉल ते माला बस स्टॉपपर्यंतच्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यात काम सुरू करण्यात आले होते़ पावसाळा सुरू झाल्यामुळे या रस्त्याचे काम अर्धवट राहिले. याच रस्त्यावर कंत्राटदाराने तात्पुरती लावलेली मलमपट्टीदेखील उखडल्याने येथे वाहतूककोंडी होत असते. पाठदुखी, मानदुखी आणि इतर श्वसनाच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाºया धुळीने पादचारी हैराण होत आहेत, शिबिरांच्या सर्वात वरील मजल्यांवरील रहिवासी पावसाळ्यामध्ये छतगळतीने हैराण झाले आहेत, तर काही गाळ्यांच्या खिडक्या, दरवाजे दुरुस्तीअभावी तुटलेल्या अवस्थेत आहेत.

टॅग्स :मुंबई