संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज गिर्यारोहण सरावाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:42+5:302021-03-07T04:06:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई आणि परिसरातील गिर्यारोहणाच्या सरावासाठी मुंब्रा रॉक नर्सरी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई आणि परिसरातील गिर्यारोहणाच्या सरावासाठी मुंब्रा रॉक नर्सरी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी ही दोन महत्त्वाची ठिकाणे असून, अनेक वर्षांपासून या ठिकाणी नियमित सराव होत होता. शिवाय राष्ट्रीय उद्यानात अनेकदा शिबिरांचे आयोजनही केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून यास मनाई करण्यात आली होती. परंतु आता गिर्यारोहकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे येथे पुन्हा एकदा गिर्यारोहणाच्या सरावाला सुरुवात हाेईल. यासंदर्भातील परवानगी मिळाली असून, रविवार ७ मार्च राेजी गिर्यारोहणाच्या सरावाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती गिर्यारोहकांनी दिली.
नॅशनल पार्क येथे रॉक क्लाईंबिंग सरावास परवानगी मिळावी म्हणून २०१२ सालापासून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने प्रयत्न सुरू केले. २०१४ साली राष्ट्रीय उद्यानाचे माजी संचालक, मुख्य वन संरक्षक विकास गुप्ता यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर नॅशनल पार्कमधील ठिकाणांचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा विस्तृत अहवाल तयार झाला. त्यानुसार २०१५ साली एक वर्षासाठी सरावास लेखी परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतरच्या वर्षी ही परवानगी वाढविली नाही. त्या अनुषंगाने महासंघाचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर गिर्यारोहणाच्या सर्व संदर्भात परवानगी देण्याबाबतचे पत्र नुकतेच महासंघास प्राप्त झाले.
* सातत्याने केला पाठपुरावा
मुंबईत फार कमी अशा जागा आहेत जेथे गिर्यारोहकांना सराव करता येईल. त्यापैकीच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे गिर्यारोहणाचा सराव केला जात होता. मात्र मध्यंतरी यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे गिर्यारोहणाचा सराव येथे करण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. हा एक धाडसी खेळ असून राज्यभरात हा खेळ आता विकसित होऊ लागला आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये सराव करता यावा म्हणून ठिकाण उपलब्ध आहे. येथे आम्हाला परवानगी मिळावी असे म्हणणे आम्ही मांडले. आता अटी आणि शर्तींचे पालन करून येथे गिर्यारोहणासाठी परवानगी मिळालेली आहे. यामुळे मुंबईतील सर्व गिर्यारोहक आनंदी आहेत. धनंजय मदन, प्रकाश वाळवेकर, राजेंद्र नेहते, अशोक पवार पाटील, संतोष निगडे, मिलिंद जोशी आणि आशिष भंडारी यांनी महासंघाच्या वतीने या विषयाचा पाठपुरावा केला. तसेच विविध गिर्यारोहण संस्थांचे सहकार्य सतत लाभले.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
.........................