Join us

Mouth Cancer Day: वेळीच ओळखा मुख कर्करोगाचा धोका, कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 09:01 IST

प्रत्येक प्रकारचा कर्करोग हा भिन्न असतो. प्रत्येक रुग्णाला होणारा त्रासही भिन्न असू शकतो. त्यामुळेच यावर्षीचे घोषवाक्य ‘युनायटेड बाय युनिक’ असे आहे.

-डॉ. रेशम पाखमोडे  (दंतरोगतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई) 

४ फेब्रुवारी हा दरवर्षी कर्करोग दिवस म्हणून जगभर पाळला जातो. कर्करोग शरीराच्या कोणत्याही अवयवांना होऊ शकतो आणि कुणालाही होऊ शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत, गरिबापासून गर्भश्रीमंत नागरिकांपर्यंत अगदी कुणालाही.   

प्रत्येक प्रकारचा कर्करोग हा भिन्न असतो. प्रत्येक रुग्णाला होणारा त्रासही भिन्न असू शकतो. त्यामुळेच यावर्षीचे घोषवाक्य ‘युनायटेड बाय युनिक’ असे आहे. कर्करोग झालेल्या सर्वांचे अनुभव भिन्न असले तरी गरज आहे समाजातील प्रत्येकाने, प्रत्येक घटकाने कर्करोगापासून बचाव करण्यासाठी एकत्र येण्याची. 

काय आहेत कारणे? 

पर्यावरणाचे बिघडणारे संतुलन, विविध प्रदूषके, किरणोत्सर्गी पदार्थ इत्यादींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याशिवाय, हा रोग आनुवंशिकेतूनही एखाद्याला होऊ शकतो. 

काही विषाणूही कर्करोग निर्माण करू शकतात. हृदयरोगानंतर कर्करोगामुळेच जगात सर्वाधिक बळी जातात. भारतात मुख कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, तंबाखूच्या विविध सवयी विशेषतः तंबाखू खाण्याच्या सवयी मुख कर्करोगाला ९० टक्के कारणीभूत असतात. 

मद्यपानसुद्धा मुख कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. या दोन्ही सवयी एकत्र असल्यास धोका खूप वाढतो.

लक्षणे कोणती? 

बऱ्याचदा मुख कर्करोगाची सुरुवात पांढऱ्या, लाल चट्ट्यांनी होते. त्याला मुखपूर्व कर्करोग म्हणतात. त्याचे वेळीच निदान केल्यास आणि उपचार केल्यास कर्करोग टाळता येऊ शकतो. 

खर्रा आणि गुटखा यांच्या सवयीमुळे बऱ्याचदा ओरल सबम्युकस फायब्रोसिस नावाचा मुखपूर्व कर्करोग होऊ शकतो. त्यानंतरसुद्धा सवय सुरू ठेवली तर त्याचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते. भारतात दरवर्षी तीन लाख नवे रुग्ण आढळतात, एक लाख लोकांचा मृत्यू होतो.

निदान आणि प्रतिबंध  

मुखपूर्व कर्करोगाचे निदान लवकर शक्य असते व ते वेळेत झाल्यास अनेक प्रकारच्या समस्यांपासून रुग्णाला आराम मिळतो, जीवनदान मिळू शकते. कारण पूर्ण क्षमतेने झालेल्या मुख कर्करोगामुळे काही वर्षातच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. 

मुख कर्करोग हा प्रामुख्याने हिरड्यांना, गालाला, खालच्या ओठांना, जिभेला,  टाळूला होऊ शकतो. तो प्रामुख्याने जखमेच्या स्वरूपात असतो आणि ही जखम दिवसेंदिवस अकारण मोठी होऊ लागते. तंबाखूच्या कुठल्याही सवयीपासून दूर राहणे, हा मुख कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्याचा सर्वांत प्रभावी प्रतिबंध आहे.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सकॅन्सर जनजागृतीडॉक्टर