मुंबई : कोळशाच्या साठ्यामुळे हाजी बंदराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने या बंदरामधील कोळशाचा साठा महाराष्ट्रातील अन्य बंदरावर किंवा गुजरातलगत असलेल्या बंदरावर हलवण्याची सूचना राज्य सरकारला केली.दक्षिण मुंबईतील हाजी बंदराच्या १९ एकर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर कोळशाचा साठा करण्यात येतो. त्यामुळे येथील स्थानिकांना फुप्फुसांचे आजार, श्वसनाचे आजार आणि अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. काही जणांचा या आजारांमुळे मृत्यूही झाला असल्याने हाजी बंदरावरील कोळशाचा साठा अन्यत्र हलवण्याचे आदेश सरकारला द्यावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका भारतातील रॉयल बँक आॅफ स्कॉटलंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीरा सन्याल यांनी दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरील सूचना राज्य सरकारला केली. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) १९ डिसेंबरपर्यंत याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
हाजी बंदरावरील कोळसा अन्यत्र हलवा
By admin | Published: December 12, 2015 2:09 AM